चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा सुरू आहे. या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी काल सोमवारी जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी वादळी वारे व अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानी संदर्भात महत्त्वाचा मुद्दा विधानसभेत मांडला.
नेमकं काय म्हणाले आमदार अमोल जावळे –
यावेळी विधानसभेत बोलताना आमदार अमोल जावळे म्हणाले की, माझा यावल-रावेर हा मतदारसंघ भारतातला सर्वात जास्त बनाना ग्रोईंग बेल्ट आहे. याठिकाणी केळीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केळीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. केळीची नुकसान भरपाई करायला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागत आहे. तर मध्यप्रदेशमध्ये नुकसान झाल्यावर पुढच्या 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात येते.
त्यामुळे मध्यप्रदेशच्या धर्तीवर, महाराष्ट्रातही त्वरित नुकसान नोंदणी करून, वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात यावी, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी यावेळी विधानसभेत केली.
तसेच रावेर-यावल विधानसभा क्षेत्रातील काही भागांमध्ये मागील महिन्यात वादळी वारे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. १५ दिवस उलटून गेले तरी शेतकरी अजूनही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे हे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत, अशी मागणीही आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत केली.