मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा – जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यातच आता चोपडा तालुक्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाकडे बेकायदेशीर विनापरवाना एक गावठी कट्टा (पिस्टेल) आणि 2 जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी या तरुणाविरोधात चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनिष सुभाष जगताप (वय-31, रा. क्रांतीनगर, महादेव मंदिराजवळ, शिरपूर, धुळे) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना परवा सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. चोपडा तालुक्यातील लासूर ते सत्रासेन रोडवर नाटेश्वर मंदिराच्या पुढे टेकडीवर आरोपी मनिष जगताप याच्याकडून बेकायदेशीर विनापरवाना एक गावठी कट्टा (पिस्टेल) आणि 2 जिवंत काडतूस, दुचाकी आणि मोबाईल, असा एकूण 1 लाख 32 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गजानन मच्छिंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी मनिष जगताप याच्याविरोधात चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास चोपडा पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर या करीत आहेत.