जळगाव, 27 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात या आठवड्याच्या सुरूवातीपासूनच मुसळधार पाऊस झालाय. पुण्यासह मुंबई, विदर्भात, कोकणात व मराठवाड्यातील काही जिल्हयात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यात आज देखील जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
काय आहे हवामान अंदाज? –
मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीपासून कमी दाबाचा द्रोणीय पट्टा विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, गंगेय पश्चिम बंगाल मार्गे उत्तर बांगलादेशपर्यंत पसरला आहे. यामुळे हवामान विभागाने उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर मराठवाड्यात आज बऱ्याच व उद्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आज शुक्रवारी आज उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नगर, नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या घाट विभागात खूप जोरदार तर मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
‘असा’ आहे जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने झोडपलंय. यामुळे शेतीपिकांचे देखील नुकसान झाले आहे. काल मध्यरात्री पाचोऱ्यासह, भडगाव तसेच जामनेर तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : धक्कादायक! प्रेम संबंधातून होणाऱ्या भांडणातून तरुणाने विवाहितेचा केला खून, नेमकं काय घडलं?