मुंबई, 29 एप्रिल : राज्यांत दिवसेंदिवस उन्हाचा पार वाढत असून उष्माघाताच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. धुळे, ठाणे आणि वर्धा जिल्ह्यात रूग्णांच्या संख्येत वाढ झाली असून राज्यात एकूण उष्माघाताचे 184 रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, उष्माघाताच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून काही जिल्ह्यांमधील तापमान हे 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. 1 मार्चपासून 26 एप्रिलपर्यंत राज्यात एकूण 184 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच मागील 14 दिवसांमध्ये 102 उष्माघाताचे रुग्ण सापडले आहेत. त्यात धुळे, ठाणे आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्माघाताचे रुग्ण सापडले आहेत. १३ ते २६ एप्रिल या कालावधीत सापडलेल्या 102 रुग्णांमध्ये धुळे जिल्ह्यात 17 रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 20 झाली आहे. ठाणे आणि वर्धा जिल्ह्यात उष्माघाताच्या रूग्णसंख्येत वाढ झाली आहे.
‘या’ व्यक्तींना उष्माघात होण्याची शक्यता –
उन्हामध्ये शेतीची कामे करणाऱ्या व्यक्ती, मूत्रपिंड, हृदयविकार, यकृत आणि त्वचाविकार तसेच रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती, धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्ती, लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना उष्माघाताचा जास्त धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
उन्हामुळे उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
- घराबाहेरून उन्हात जाताना प्रत्येकाने आरोग्य सांभाळण्याची गरज आहे.
- उन्हाळ्याच्या दिवसांत तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे,
- भरदुपारी उन्हात कामे करण्याचे टाळणे आवश्यक आहे.
- दुपारी आवश्यक काम असेल तरच घरातून बाहेर पडावे.
- बाहेर निघताना स्वतःचा उन्हापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.
- दिवसभराची कामे शक्य झाल्यास सकाळी व सायंकाळी करावीत.
- उन्हाळ्याच्या दिवसांत पांढरे आणि हलके सुती कपडे वापरावे.
हेही वाचा : सूर्य आग ओकतोय, जळगावचे तापमान महाराष्ट्रात सर्वात जास्त, पुढचे तीन दिवस आणखी महत्त्वाचे..