जळगाव, 11 एप्रिल : जळगावच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या आठवड्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे पुन्हा आता भारतीय जनता पक्षात परतणार आहेत, असे त्यांनी जाहीर केले. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली.
भारतीय जनता पक्षातील नेत्यांना कंटाळून आपण भारतीय जनता पक्षा राजीनामा देत असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. यानंतर अत्यंत कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला साथ दिली असेही ते म्हणाले होते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ खडसेंनी पक्षाला सोडत भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांनी एकनाथ खडसेंना पक्षात घेतलं ही माझी चूक झालेली आहे. हे त्यांनी मान्य केलंय, अशी माहिती माजी आमदार सतीश पाटील यांनी दिली. माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी आमदार सतीश पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
डॉ. सतीश पाटील नेमकं काय म्हणाले –
मी कोणतीही गोष्ट स्पष्टपणे मांडण्याचा माझा स्वभाव आहे. मी हे भाकित केलं होतं की, ते कारण सांगतायेत की, डॉक्टरांनी मला सल्ला दिला आहे. माझं 54 टक्के हार्ट काम करत आहे आणि अशा परिस्थितीत ते निवडणूक लढणार नाही, असा दावा मी केला होता. आज माझा तोच दावा लोकांना मान्य आहे की, हेच भाकित सतीश पाटील यांनी केलं होतं.
आज रक्षाताईच्या तिकिटाच्या मागे ही सगळी खेळी एकनाथ खडसे यांनी त्यावेळी केली होती आणि ते सगळं उघड झालेलं आहे. ते दिल्लीला का गेले होते, त्यांनी कुणाच्या भेटी घेतल्या होत्या, तिथे काय बोलणी झाली होती. नंतर फोटोही व्हायरल झाले. त्यामुळे आता कळतंय की सतीश अण्णांनी सांगितलेली गोष्टं खोटी नव्हती, असे ते म्हणाले.
अखेर शरद पवार यांनी दिली कबुली –
परवा पुण्याला मिटिंग झाली. पवार साहेबांनी आम्हाला बोलावलं होतं. आमचे प्रमुख अरुणभाई गुजराथी, मी, देवकर आप्पा, राजीवदादा देशमुख यांच्यासमवेत चर्चा करत असताना, जेव्हा या गोष्टी निघाल्या, त्यावेळी मी साहेबांना सांगितलं की, त्यावेळी मी अर्धातास तुमच्याशी भांडलो होतो की, या माणसाला घेऊन पक्षाला काहीही फायदा होणार नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी ते येत आहेत आणि तरीही तुम्ही यांना आमदारकी दिली. त्यावेळी तुम्ही आमचं ऐकलं असतं, एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला ही आमदारकी मिळाली असती तर आज आपल्याला उमेदवारीसाठी इकडेतिकडे फिरावं लागलं नसतं. यावर परवा पवार साहेबांनी असं सांगितलं की, सतीश तु खरंच त्यावेळी विरोध केला होता, ही माझी चूक झालेली आहे. हे त्यांनी मान्य केलंय.
मी उत्तर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी घेईल आणि येथून राष्ट्रवादीची ताकद दाखवून देतो, मसा शब्द एकनाथ खडसेंनी पवार साहेबांना दिला होता. मात्र, आता ती ताकद तर काही वाढलीच नाही, जे काही वाटोळं वायचं ते झालं. त्यांच्या उमेदवारीसाठी रावेर मतदारसंघात त्यांचे नाव सुचवले होतं, आता त्यांचं नाव बाजूला सारल्यावर आम्हाला शेवटपर्यंत योग्य उमेदवार शोधावा लागला आणि आज ते नाव जाहीर झालं. खडसेंच्या ऐवजी चांगल्या कार्यकर्त्याला आमदार केलं असतं तर पक्षाची ताकद वाढली असती, असेही माजी आमदार सतीश पाटील यावेळी म्हणाले.