जळगाव, 6 जून : जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशिया देशातील सेंट पीटर्सबर्ग नजीक नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी आहेत. तर तिसरा विद्यार्थी भडगाव येथील आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
रशियातील सेंट पीटर्सबर्गमधील नॉबबोर्ड या विद्यापीठात हे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, 4 जून रोजी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्ग जवळ असलेल्या वॉलखोप या नदीत पाय घसरून पाच जण बुडाल्याची माहिती आहे. यामध्ये तीघांचा मृत्यू झालाय. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे रशियातून ही माहिती प्राप्त झाली आहे.
रशियात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थांमध्ये अमळनेर येथील जिया फिरोज पिंजारी आणि जिशान अशपाक पिंजारी ही दोघे भाऊ-बहिण आहेत. हर्षल देसले हा मृत विद्यार्थी भडगाव येथील आहे.
रशिया येथील प्रशासन आणि पोलीस यांच्यावतीने भारतीय दूतावासाला या घटनेबाबत कळविण्यात आले आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माहिती कळवून मयत विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत संपर्क साधला आहे. रशियात बुडून मृत्यू झालेल्या चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूने जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी रशियात कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली आहे.
हेही वाचा : तब्बल 53 वर्षांनंतर स्मिता वाघ यांच्या रूपाने अमळनेरच्या वाट्याला आली मोठी संधी!