जळगाव, 24 नोव्हेंबर : नगर पालिका, नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक असलेल्या मुलभुत सोई-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन जर्नादन पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक भुकन प्रत्यक्ष उपस्थित होते तर दूरदृश्य प्रणालीव्दारे सर्व नगरपरिषदांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रोहन घुगे पुढे म्हणाले की, मतदान केंद्रांवर पिण्यासाठी पाणी, स्वच्छता गृह, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरची सुविधा आदि आवश्यक सोई-सुविधा मतदानाच्या दिवशी उपलब्ध करुन दयाव्यात, आदर्श आचार संहितेचे विविध पथकांमार्फत प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असून त्यासाठी जीओ टॅग लोकेशन कार्यान्वीत करण्यात यावेत, तसेच नगरपालिका क्षेत्रात संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्र असणाऱ्या भागात पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, एक खिडकी कक्ष पुरेशा मणुष्यबळासह कार्यान्वीत ठेवणे तसेच स्थानिक स्तरावरील मिडीया कक्षमार्फत निवडणूक विषयक माहिती पत्रकारांना वेळोवेळी देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
स्वीप कार्यक्रमातंर्गत मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, निवडणूक कामात सहभागी असलेल्या कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना माहिती देणे, यावेळी जिल्हाधिकारी यांनी टपाली मतपत्रिका, मतपत्रिका छपाई, स्ट्रॉग रुम, EVM Setting व Sealing, मतदान यंत्रे CU व BU. FLC तसेच इतर मतदान साहित्य, कायदा व सुव्यवस्था, आठवडे बाजार बंद, क्षेत्रिय अधिकारी यांना कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकारी प्रदान करणे, शस्त्र जमा करण्याबाबत, विविध परवानगी विषयक कक्ष व परवानगी देणे, मतदार जनजागृती, दारुबंदीची अंमलबजावणी करणे, निवडणक खर्च व स्टार प्रचारक, मतमोजणी (मतमोजणी नियोजन, प्रशिक्षण), वाहतूक आराखडा नियोजन या विषयांचा आढावा त्यांनी घेतला.






