जळगाव, 22 मे : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून या लाटेमुळे असह्य उकाडा निर्माण झाला आहे. अक्षरक्षः तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. दरम्यान, जळगावातील तापमान आज 46.3 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले.
उन्हाच्या लहरीमुळे जळगावकर हैराण –
जळगाव शहर व जिल्ह्यात यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरत आहे. फेब्रुवारीपासूनच पडत असलेल्या उन्हाच्या लहरीमुळे जळगावकर अक्षरशः हैराण झाले आहेत. आज जळगावात कमाल 46.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे विनाकारण बाहेर पडू नका, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
वाढत्या तापमानाचा नागरिकांना करावा लागतोय सामना –
आज उन्हाच्या पाऱ्यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. घरामध्ये देखील नागरिकांना उष्णता जाणवत होती. दरम्यान, रात्रीही जळगावकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यंदा मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे उष्णतेला तोंड द्यावे लागत आहे. उन्हामुळे जळगावकरांची अक्षरशः लाही-लाही झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी मान्सून वेळेत दाखल व्हावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
हेही वाचा : पुणे पोर्श कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालला 24 मेपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयात नेमकं काय घडलं?