श्रीनगर – हरयाणा विधानसभा सोबतच आज जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मिरमध्ये 90 जागांवर निवडणुकीचे निकाल लागणार असताना मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये सर्व जिल्हा मुख्यालयांवर कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये 2014 नंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने नागरिकांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. ही विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांत पार पडली आहे. यामध्ये 873 उमेदवारांचे भवितव्य काय असणार? हे आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. तर जम्मू-काश्मीरमधील 20 मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एक्झिट पोल काय सांगतो –
शनिवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी आघाडीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. 2014 च्या तुलनेत भाजपाला मिळणाऱ्या जागांमध्ये किंचित सुधारणा होण्याचा अंदाज आहे. तर पीडीपीला सर्वात मोठा झटका बसणार आहे. 28 जागा जिंकणाऱ्या पीडीपीला यावेळी 10 पेक्षा कमी जागा मिळेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.
मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित सर्व तयारींचा आढावा घेण्यात आला आहे. सर्वांना भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर मतदानाशी संबंधित अपडेट पाहायला मिळतील. मतमोजणी केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, अशी माहिती राजौरीचे जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO) अभिषेक शर्मा यांनी दिली.
हेही वाचा – भाजप की काँग्रेस?, हरयाणा राज्यात कुणाचं सरकार येणार?, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात