मुंबई – भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची आज पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित आर. आर. पाटील यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर आपल्या पहिल्याच भाषणात सभागृह गाजवले.
काय म्हणाले आमदार रोहित आर. आर. पाटील –
विधानसभेत आपल्या पहिल्याच भाषणात बोलताना आमदार रोहित आर. आर. पाटील म्हणाले की, या देशाचं वेगळेपण टिकून आहे, त्याचं कारण असं आहे की, अनेक शाह्या, या देशाने पाहिल्या. पण लोकशाही ही अत्यंत महत्त्वाची शाही या देशाच्या वाट्याला आली आणि संबंध जगात आपला देश स्वत:चं वेगळंपण टिकवू शकला, वेगळंपण निर्माण करू शकला. त्याचं दुसरं कारण असं आहे की, संसदीय कार्यपद्धती जी आपण कमावली, त्या संसदीय लोकशाही पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला वेगळे महत्त्व निर्माण झालं.
View this post on Instagram
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकमताचा अधिकार आपल्याला दिला. त्या एकमताच्या माध्यमातून आपण जो अधिकार आपल्याला मिळाला, त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण सर्वजण इथे बसलेलो आहोत. अध्यक्ष महोदय, मी आपलं अभिनंदन करताना आपल्याला विनंती करेन की, आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटाकवलेला आहे, तसा मीसुद्धा सर्वात तरुण सदस्य म्हणून या विधीमंडळात बसण्याचा मान पटकावलेला आहे. त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुमचं सर्वात तरुण सदस्याकडे बारीकपणाने लक्ष असेल, अशी विनंती करतो. आपण एक निष्णांत वकील आहात. आम्हीसुद्धा वकिली पूर्ण करतोय. एक नंबरवर बाकावर बसलेल्या वकिलांकडे जसे तुमचं लक्ष असतं तसं याही वकिलाकडे लक्ष असू दे, अशीही विनंती करतो.
या सदनाची गरिमा राखत असताना अनेक मोठी नावे याठिकाणी घडली. खूप मोठी परंपरा याठिकाणी निर्माण झाली. तशा काळात आपली कारकिर्द जर पाहिली तर सदस्य म्हणून आपण चांगले काम केले आहे. पण यापुढच्या काळातही विरोधी पक्षावर आपलं लक्ष असेल विरोधी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या आपण मान्य कराल, पूर्ण कराल, आम्हालाही आपण न्याय द्याल, अशी मी विनंती करतो, असे म्हणत माझ्या आयुष्यातील सर्वात प्रथम शपथ मी हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांच्या माध्यमातून घेतली, त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीसांना रोहित आर. आर. पाटील काय म्हणाले –
यावेळी आमदार रोहित आर. आर. पाटील म्हणाले की, फडणवीस साहेब, संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहूनी गोड तुझे नाम देवा. आता संतांच्या वाणीतूनही आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतले गेलंय. त्यामुळे पुढच्या काळात काम करताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूक द्याल, अशी विनंतीसुद्धा मी आज याठिकाणी आपल्याला करतो आणि फडणवीस साहेब अमृताहूनी गोड मी मुद्दामूनच म्हटलं कारण पुराणातही अमृताला एक वेगळं महत्त्व होतं आणि आजही.
अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यात असे लक्षात येते की, वेगवेगळ्या ज्या समित्या गठीत होतात, त्यांच्या माध्यमातून चांगले कामकाज याठिकाणी व्हावं, अशीही मी विनंती याठिकाणी करतो. कारण, जी आश्वासने अधिवेशनादरम्यान दिली गेली, त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, असे आम्हाला ऐकायला मिळालं. त्यामुळे यावरही आपण वचक ठेवावा, सन्माननीय सदस्यांना न्याय द्यावा, अशी विनंती.
चांगले कायदे या सदनात तयार व्हावेत. एक तरुण म्हणून माझी अपेक्षा आहे की, तरुणांना अभिप्रेत असलेले हे राज्य, उद्या नवमहाराष्ट्र म्हणून घडत असताना आपण उद्याच्या राज्याला अभिप्रेत असलेले आणि 21 व्या शतकाला अभिप्रेत असलेले कायदेच या विधीमंडळात तयार व्हावेत आणि या सर्व पुढच्या पिढीला न्याय देण्याची भूमिका विधीमंडळाने घ्यावी, एवढीच विनंती मी आपल्या सर्वांसमोर आज याठिकाणी करतो.
‘…तेव्हा गारगार वाटायचे’, ईव्हीएमवरुन अजितदादा भडकले, विरोधकांना साधला जोरदार निशाणा