जळगाव, 5 सप्टेंबर : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशभरातील (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेम वर्क) शैक्षणिक संस्थांच्या मानांकनात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अनुदानित राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या गटात अव्वल कामगिरी करत 51 ते 100 या क्रमाकांत स्थान कायम ठेवले आहे.
केंद्रीय मंत्रालयाने देशातील उच्च शिक्षण संस्थांची गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी श्रेणी जाहीर केली. याक्रमवारीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने भारतातील 51 ते 100 सर्वोच्च सार्वजनिक अनुदानित राज्य विद्यापीठांच्या गटात उत्तम कामगिरी करत आपले स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे. दरवर्षी एनआयआरएफ रैंकिंग जाहीर केली जात असते. यामध्ये अध्ययन, अध्यापन, संसाधने, संशोधन, परीक्षांचे निकाल, समावेशकता आदी निकषांचा विचार केला जातो.
कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने गेल्या तीन वर्षात अध्ययन, अध्यापन, संशोधन तसेच गेल्या वर्ष भरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांकरिता खुल्या वैकल्पिक विषयांची तयार केलेली पुस्तके, एम्बेडेड डिग्री प्रोग्राम अंतर्गत सुरू केलेले नाविन्य पूर्ण अभ्यासक्रम तसेच विविध सुविधा यामध्ये भरीव वाटचाल केली आहे.
प्रतिष्ठीत इंग्रजी नियतकालिकाने दोन महिन्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठासाठी बहुविद्याशाखीय विद्यापीठ गटात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला 31 वे तर पश्चिम विभागीय विद्यापीठाच्या गटात 9 वे स्थान प्राप्त केले आहे.
आता एनआयआरएफ च्या रैंकिंग मधे विद्यापीठाने आपले स्थान कायम ठेवल्यामुळे विद्यापीठाचे वेगळेपण अधारेखित झाले आहे. विद्यार्थी संख्या, शैक्षणिक संसांधने, शोधनिबंध, पेटंट, संशोधन प्रकल्प तसेच विद्यार्थ्यांना प्राप्त होणारी प्लेसमेंट यामध्ये विद्यापीठाने आघाडी घेतली आहे.