चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
अमळनेर, 4 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात लासगावचे सुपुत्र खलील देशमुख यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगादानासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा तथा पुणे येथील लेखिका प्रतिमा परदेशी यांच्या हस्ते खलील देशमुख यांना सन्मानपत्र भेट देत गौरविण्यात आले.
खलील देशमुख यांचा सन्मान –
अमळनेर येथे 3 व 4 फेब्रुवारी दरम्यान, विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनात पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते खलील देशमुख यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्यतर्फे दिला जाणारा विद्रोही जीवनगौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले.
गेल्या चार दशकांपासून खलील देशमुख हे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी कुशल वक्तृत्व आणि अन्यायाविरूद्ध लढण्याची निर्भीड वृत्तीच्या बळावर सामाजिक चळवळीचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान, युवा संघर्ष समिती, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, युवक क्रांती दल, शेतकरी संघटना, समाजवादी मित्र, बिरादरी संघटना त्याचप्रमाणे मुस्लिम सेक्युलर डेमोक्रसी यांसारख्या अनेक संघटनांमध्ये त्यांनी काम केले.
तसेच विविध वर्तमान पत्रांमध्ये अनेक सामाजिक विषयांवर लिखाण करत त्यांनी सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, शोषित तसेच वंचित यांचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रयत्न केले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले आहे.
राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन, जाती निर्मूलन तसेच अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या अनेक विषयांवर देशभरातील प्रमुख विचारवंतांना घेऊन त्यांनी शिबिरांचे यशस्वीपणे आयोजन केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हेही वाचा : महत्वाची बातमी! 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थीनींना पूर्ण शुल्क माफी