चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
धुळे/मुंबई : खान्देशात काँग्रेससह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. कारण, काँग्रेसचे मोठे नेते आणि धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. यानंतर आता त्यांनी भाजप प्रवेशाआधी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरील कव्हर फोटोही बदलला आहे.
भाजप प्रवेशाआधी कुणाल बाबांनी बदलला फेसबुक कव्हर फोटो –
दरम्यान, आपल्या भाजप प्रवेश सोहळ्याआधी आमदार कुणाल बाबा पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरील कव्हर फोटोही बदलला आहे. यामध्ये त्यांनी नवे विकासपर्व लोकहिताचे, लोकसाथीचे अशी घोषणा लिहिली आहे. तसेच या कव्हर फोटोवर कुणाल बाबा पाटील यांचे वडील, माजी मंत्री दिवंगत रोहिदास दाजी पाटील यांचाही फोटो आहे.
याआधी कव्हर फोटो कोणता –
दरम्यान, याआधी त्यांनी 7 जुलै 2024 रोजी म्हणजे 2024 च्या विधानसभा निवडणुकीआधी आपल्या फेसबुक अकाउंटरील कव्हर फोटो बदलला होता. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबतचा भारत जोडो यात्रेतील फोटा ठेवला होता. त्यावर सर्वांगीण प्रगती, संपूर्ण विकास अशी घोषणाही लिहिली होती. दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कुणाल बाबा यांचा पराभव झाला. यानंतर आज ते काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते हे महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. काही जण हे शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत. तर काही जण हे भारतीय जनता पक्षात जात आहेत. यातच आता खान्देशातील काँग्रेस पक्षाचे मोठे नेते, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील हे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. कुणाल पाटील यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस तसेच महाविकास आघाडीला खान्देशात मोठा धक्का बसणार आहे.