लासगाव, 6 सप्टेंबर: पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता संस्थेच्या आवारात पार पडली. संस्थेचे चेअरमन डॉ. अ. हादी अ. वाहेद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
संस्थेचे सचिव रविंद्र हरी परदेशी यांनी सभेपुढे विविध विषय मांडले. मागील विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. तसेच सन २०२५-२६ चे वार्षिक पत्रक, व्यापारी पत्रक, नफा-तोटा पत्रक आणि ताळेबंद पत्रक सभेत सादर करून मंजूर करण्यात आले. या पत्रकांमध्ये संस्थेचे मुख्य कार्यालय, धान्य दुकान आणि खत विभागाचा समावेश होता. सभेला व्हाईस चेअरमन राजेंद्र हरी महाजन, सचिव रविंद्र हरी परदेशी, विजय पाटील, खलील देशमुख यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सभासद ठरावावरून सभेत वातावरण तापले –
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आगामी काळात होणार असल्याने विविध सहकारी संस्थांच्या ठरावांकडे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर लासगाव सोसायटीच्या सभेत सभासद ठरावाचा मुद्दा चर्चेत आला.
ठराव मंजूर करताना आधीच सभासदांच्या सह्या घेण्यात आल्या आणि त्यानंतर सोसायटीच्या चेअरमनचा ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप एका सभासदाने केला. ठरावाच्या वेळी सर्व सभासदांना योग्य माहिती देणे आवश्यक होते, असेही त्यांनी सांगितले.
यावर स्पष्टीकरण देताना विजय पाटील यांनी सांगितले की, संचालक मंडळातील सदस्यांशी चर्चा करून ठरावाबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर संबंधित ठराव देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
३१ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे प्रस्ताव –
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ साठी पहिल्या टप्प्यात संस्थेतील सभासद असलेल्या ३१ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे प्रस्ताव आतापर्यंत पाठवण्यात आल्याची माहिती विजय पाटील यांनी दिली. त्यापैकी १८ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून १० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे जोडावीत, असे आवाहनही करण्यात आले.
तसेच कर्जाची परतफेड न केलेल्या सभासदांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळत आहे. यामुळे, नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचेही यावर्षीचे कर्ज शासनाने भरावे, असा ठराव यावेळी मांडण्यात आला.
एटीएमसाठी तयार केलेली जागा भाड्याने देण्याची मागणी –
सोसायटीच्या आवारात एटीएम केंद्र सुरू करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जागेचा सध्या सोसायटीच्या खताचा काही माल ठेवण्यासाठी वापर केला जात आहे. मात्र, अनेक दिवसांपासून या ठिकाणी एटीएम सुरू झालेले नसल्याने ही जागा भाड्याने देण्याबाबत एका सभासदाने प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान, एटीएम सुरू करण्यासाठी लागणारा खर्च तसेच एटीएममध्ये नियमित रोख रक्कम उपलब्ध ठेवण्याची सोसायटीची आर्थिक क्षमता नसल्याने एटीएम सुरू करणे शक्य नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे एटीएमसाठी तयार केलेली जागा अन्य व्यक्ती किंवा संस्थेला भाड्याने देण्यात यावी, अशी मागणी सभासदाने केली. यावर संबंधित जागेसाठी नोटीस काढून ती भाड्याने देण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असे सांगण्यात आले.






