जळगाव, 5 सप्टेंबर: जळगाव जिल्हा स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ‘स्वच्छ, सुंदर व हरित जळगाव’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवश्यक सूचना व निर्देश दिले आहेत.
घनकचरा व्यवस्थापन संदर्भातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर –
घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ नुसार कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी व विशेष काळजी अशा चार प्रवाहांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून, ग्रामीण भागात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर निश्चित करण्यात आली आहे. या नियमांमध्ये बल्क वेस्ट जनरेटर, रिफ्यूज डिराईव्ह्ड फ्युएल, वेस्ट टू एनर्जी, सॅनिटरी लँडफिल, रिसायकलिंग तसेच सीपीसीबीच्या केंद्रीकृत ईपीआर पोर्टलसारख्या विविध संकल्पनांचा समावेश आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व ग्रामपंचायतींनी नियमितपणे घरोघरी जाऊन कचरा संकलन करावे तसेच उपलब्ध ट्रायसायकल, ट्रॅक्टर, फॅब्रिकेशन शेड आदी पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आवश्यकतेनुसार कचरा व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या सुविधा, उपकरणे व इतर बाबींसाठी १५ वा व १६ वा वित्त आयोग तसेच ग्रामपंचायतींच्या स्वनिधीचा वापर करता येणार आहे. प्रत्येक गणनिहाय अथवा जास्तीत जास्त पाच ग्रामपंचायतींसाठी विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून कचरा संकलन, वर्गीकरण, देखरेख, नियंत्रण व अहवाल संकलनाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
घरोघरी कचरा संकलनासाठी उपलब्ध स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता दूत तसेच बचत गटांचा योग्य पद्धतीने उपयोग करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने १५ सप्टेंबरपर्यंत घनकचरा व्यवस्थापनाचा स्वतंत्र आराखडा तयार करावा. या आराखड्यामध्ये वाहन व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण शेड, मनुष्यबळ व्यवस्थापन व इतर आवश्यक बाबींचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक मनुष्यबळ ग्रामपंचायतींनी स्वनिधी अथवा १५ व्या आणि १६ व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध तरतुदीतून नियुक्त करावे. ग्रामपंचायतींच्या अधिपत्याखालील नादुरुस्त कचरा संकलन वाहने दुरुस्त करून कार्यान्वित करावीत. तसेच कचरा संकलन केंद्र, त्याचा परिसर व कंपोस्ट पीट यांची स्वच्छता करून आवश्यक सुविधा सुस्थितीत आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत हद्दीतील पारंपरिक कचरा डम्पिंग ग्राउंडची पाहणी करून संबंधित ठिकाणे २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत स्वच्छ करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील बल्क वेस्ट जनरेटर संस्थांची पाहणी करून त्यांची १० सप्टेंबरपर्यंत नोंद घेण्यात येणार आहे. संबंधित संस्थांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत.
या अभियानासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार असून जिल्हास्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. शिक्षण विभागामार्फत शालेय स्तरावर विविध उपक्रमांचे नियोजन करून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतींनी गावपातळीवर व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः बचत गटांमधील महिलांच्या सहभागातून ग्रामीण भागात स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
‘स्वच्छ, सुंदर व हरित जळगाव’ या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि सुंदर बनविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कालबद्ध नियोजन केले असून सर्व संबंधित यंत्रणांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






