लोणवाडी (जळगाव), 8 सप्टेंबर : जळगाव तालुक्यातील लोणवाडी ग्रामपंचायतीत पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थी यादीतून पात्र लाभार्थ्याचे नाव वगळल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. घरकुल लाभार्थी कमलाबाई शिवाजी चव्हाण यांचे नाव यादीतून वगळल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांनीच आव्हान दिले असून सरपंच व ग्रामसेवकांनी एकतर्फी ठराव केल्याचा ठपका ठेवला आहे.
दरम्यान, संबंधित सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून ठराव रद्द करण्यासोबतच ग्रामसेवक-सरपंचांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य संदीप भास्कर पवार, साईदास राठोड यांच्यासह सात सदस्यांनी तक्रार दाखल केली असून, लोणवाडी येथील कमलाबाई शिवाजी चव्हाण यांचे नाव लाभार्थी यादीतून वगळणे हा एकतर्फी निर्णय असल्याचे त्यांनी तक्रारीतून स्पष्ट केलंय.
…अन् माहितीचा अधिकारद्वारे मिळवली माहिती –
लाभार्थी महिलेचा मुलगा अॅड. अरुण चव्हाण यांनी माहिती अधिकारातून माहिती मागवली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये जानेवारी महिन्यातील ठरावात 30 नावे वगळल्याचे नमूद होते. मात्र, नंतर दोन नावे हाताने वाढवून कमलाबाई चव्हाण यांचे नाव यादीतून हटवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. आल्याचे स्पष्ट झाले. या खाडाखोडीमुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.
लोणवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच व इतर सदस्यांना विश्वासात न घेता, सरपंच आणि ग्रामसेवकांनीच हा ठराव केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. याप्रकरणी जळगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे दिनांक 4 सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. साईदास राठोड, संदीप भास्कर पवार, मंगला रमेश पाटिल, श्रावण सदू राठोड, वैताबाई रोहिदास चव्हाण, आशाबाई रमेश ठाकरे आणि गीता बाळू धाडी या 7 सदस्यांच्या तक्रार अर्जावर सह्या आहेत. दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या पुढील कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार –
सरकारी दस्तऐवजांत फेरफार केल्याचा आरोप करत अॅड. चव्हाण यांनी थेट जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण, सरपंच अनिता धाडी व त्यांचे पती बळीराम धाडी आणि यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच लाभार्थ्याला पैसे मागितल्याचा व घरकुल नाकारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.