मुंबई, 29 सप्टेंबर: राज्य शासनाच्या विविध विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अद्याप वैश्विक ओळखपत्र (UDID Card) नाही, त्यांना हे कार्ड प्राप्त करण्यासाठी आता 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने २८ सप्टेंबर २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.
या 5 प्रमुख योजनांच्या लाभार्थ्यांना मिळणार फायदा –
शासनाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी खालील ५ महत्त्वाच्या विशेष सहाय्य योजना राबविल्या जातात:
- संजय गांधी निराधार अनुदान योजना
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
पूर्वी या योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालवल्या जात होत्या, मात्र १ एप्रिल २०२६ पासून या योजना ‘दिव्यांग सक्षमीकरण विभागा’कडे वर्ग करण्यात आल्या आहेत.
मुदतवाढ देण्याचे कारण काय? –
शासनाने या योजनांचा लाभ घेण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (UDID Card) बंधनकारक केले आहे. यासाठी आधी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, सध्या “महाडीबीटी २.०” हे महाडीबीटी पोर्टल नव्या स्वरूपात अद्ययावत (Update) करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने दिव्यांग बांधवांना आणखी 3 महिने म्हणजेच 31 डिसेंबर 2026 पर्यंत वाढीव मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणाला मिळणार मुदतवाढ? –
हा निर्णय केवळ अशा लाभार्थ्यांसाठी लागू असेल ज्यांना १ एप्रिल २०२६ पूर्वीपासून या विशेष सहाय्य योजनांमधून दिव्यांगांच्या प्रवर्गातून अनुदान मिळत होते आणि ज्यांच्याकडे अद्याप UDID कार्ड उपलब्ध नाही.






