जालना, 16 सप्टेंबर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्री 12 वाजेपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील आजही ठाम असून त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाचं हत्यार उपसले आहे. दरम्यान, सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. ते आज जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आजपासून मध्यरात्री उपोषण –
मनोज जरांगे पाटील यांनी मराठावाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत आजपासून मध्यरात्री 12 वाजेपासून उपोषणाला बसणार असल्याचे स्पष्ठ केले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करत असून ही मराठा समाजाने राज्य सरकारला दिलेली आणखी एक संधी आहे, असे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
उपोषणाला बसण्यापुर्वी काय म्हणाले? –
मनोज जरांगे पाटील जालन्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना म्हणाले की, आजपासून मी राजकीय विषयावर बोलणार नाही. मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत बघत नाही. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नसून त्यामुळे राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही. राज्य सरकारने आमच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा नंतर बोंबलू नये. देवेंद्र फडणवीसांनी भाजपमधील काही माकडांना सांगावे की, जरांगे पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे. दरम्यान, निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नसल्याचेही असे जरांगे पाटील म्हणाले.
आतापर्यंत पाच वेळा उपोषण –
गेल्या एका वर्षापासून मनोज जरांगे हे सरकारला मुदत देऊन आंदोलन करत असून आतापर्यंत पाच वेळा जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, अद्याप मनोज जरांगे पाटील यांची ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची मागणी पूर्ण झालेली नाही.
हेही पाहा : Video : लढाई आमदारकीची : शरद पवार की अजित पवार?, पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांची स्फोटक मुलाखत