जालना, 13 जून : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान, त्यांनी हे उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्यासोबत चर्चा केल्याने उपोषण स्थगित करत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिष्टमंडळात राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचा समावेश होता.
मनोज जरांगेंनी केली उपोषण स्थगित –
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सगेसोयरेच्या बाबत निर्णय घेण्यासाठी योग्य ते पाऊल सरकारकडून उचलले जाईल, असे आश्वासन त्यांनी जरांगे यांना दिले. यावेळी जरांगे यांनी सरकारला सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा अल्टीमेटम दिला. तर सरकारच्या शिष्टमंडळाने आम्ही तातडीने याबाबतच्या बैठका घेऊ आणि निर्णय घेऊ, असे आश्वासन दिलं. या आश्वासनानंतर आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली, यावेळी जरंगे यांनी केली.
जरांगे यांनी दिला सरकारला इशारा –
मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा घोषणा केली. मात्र, त्यांनी यावेळी सरकारला एक महिन्याची मुदत देत मोठा इशारा दिला. जर सरकारने 13 जुलैपर्यंत सगेसोयरे अध्यादेशाचा निर्णय न झाल्यास आपण आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरु, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी सरकारला दिला. तसेच मंत्री देसाई आले म्हणून आम्ही उपोषण मागे घेत असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
हेही वाचा : “चार महिने द्या, मला राज्य सरकार बदलायचंय,” शरद पवार नेमकं काय म्हणाले?