मिलिंद वाणी, प्रतिनिधी
अमळनेर/चोपडा : अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी चोपडा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजातर्फे 15 जुलैपासून अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा –
आदिवासी कोळी समाजाच्या ह्या आंदोलनास अमळनेर येथील सकल मराठा समाजाचा व प्रकाशभाई युवा मंचने जाहीर पाठिंबा दिला आहे. आज आंदोलनाचा 4 था दिवस आहे. तरीही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही. यादरम्यान प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी आंदोलनकर्त्यांसोबत मागण्यांबाबत चर्चा केली. मात्र, यावर अजूनही तोडगा निघाला नाहीये.
…अन्यथा ठिय्या आंदोलनातच तीव्र आमरण उपोषण –
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटिल यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन प्रांताधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून दाखले देण्याबाबत सूचना केल्यात. संबंधित विभागाने प्रलंबित व नवीन दाखल होणाऱ्या प्रकरणांना तात्काळ टोकरेकोळीचे जातप्रमाणपत्र द्यावेत, अन्यथा ठिय्या आंदोलनातच तीव्र आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर चोपडा व मधुकरगुरु सोनवणे अमळनेर, प्रवर्तन संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाटे यांनी सांगितले आहे.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, प्रकाश भाई, सुरेश पाटील, नरेंद्र पाटील, अमित ललवाणी, हर्षल देशमुख, प्राध्या.किरण पाटिल, विधीज्ञ प्रशांत संदानशिव, योगेश कोळी यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : आषाढी एकादशी विशेष : विठुरायाच्या नामघोषाने दुमदुमली पिंपळगाव हरेश्वर नगरी