मराठमोळा नृत्य दिग्दर्शक अवि पायाळ गेली 21 वर्षे मनोरंजन क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे, अॅवार्ड शोज आणि डान्स कॉम्पिटीशनमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. नृत्य दिग्दर्शनानंतर ते आता नवरात्रीनिमित्त रास रंग गरब्याचे परिक्षण करत आहेत. हा कार्यक्रम नवरात्रीचे 3 दिवस ठाणे आणि डोंबिवली येथे आयोजित केला आहे. अवि पायाळ हे डोंबिवली भागाचे परीक्षकाचे काम गेली 3 वर्ष सतत बघत आहेत. आणि या ही वर्षी ते परीक्षक म्हणून काम पाहतील.
मराठमोळा नृत्यदिग्दर्शक अवि पायाळ सांगतो, “मला लहानपणी नृत्याची फारशी आवड नव्हती परंतु आमची बिकट परिस्थिती असूनही माझ्या ताईने नृत्याचा क्लास लावला. मग मी ही क्लास लावला. बसला पैसे नसल्यामुळे तब्बल 15 किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागायचा. मला नृत्याची गोडी लागू लागली आणि माझा नृत्याचा प्रवास सुरू झाला. मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे, अॅवार्ड शोज, फॅशन रॅम्प वॉक शोज आणि डान्स कॉम्पिटीशनमध्ये नृत्यदिग्दर्शन केल्यानंतर आता मला नऊ दिवस रास रंग गरब्याचे परीक्षण करण्याची संधी मला लाभली.”
पुढे तो सांगतो, “लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मी बऱ्याचश्या हॉस्पिटलमध्ये मानसिक ताणतणाव घालण्यासाठी डॉक्टर आणि पेशंटस् करिता नृत्याची शिबिरे घेतली होती. तसेच गेली पाच वर्ष मी ‘ऑल इंडिया आर्टिस्ट असोसिएशन शिमला’ येथे क्लासिकल, मॉडर्न, सालसा नृत्य प्रकाराचे परिक्षण करत आहे. तेथे मला सर्वात तरुण परीक्षक म्हणून संबोधले गेले. परीक्षक म्हटल्यानंतर एक जबाबदारी येते. कारण मी सुद्धा आधी अनेक नृत्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि मला देखील कोणी तरी जज केले होते. मला नृत्यदिग्दर्शन आणि परीक्षण करून अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळतात. माझा नृत्यासोबतचा हा प्रवास अखंड सुरू रहावा हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे.”