जळगाव, 3 मे : जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून मंत्री गिरीश महाजन विरूद्ध माजी मंत्री एकनाथ खडसे हे समीकरण जणू काही कायम बनले आहे. एकनाथ खडसे असो किंवा गिरीश महाजन या दोघांनी आतापर्यंत विविध मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना रक्षा खडसे यांच्या प्रचारावरून पुन्हा एकदा डिवचले आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
गेल्या काही दिवसांपुर्वी, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप हा पक्षप्रवेश झाला नाही. असे असताना सून रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे सक्रिय झाले आहेत. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांची खडसेंवर टीका –
मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. एकनाथ खडसे यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर त्यांनी भाजपचे काम करावे. एकनाथ खडसेंच्या भूमिकेमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. ते कधी म्हणतात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे. विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. असे असताना खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची असून त्यांनी एक नेमकी भूमिका घ्यायला हवी, असा टोला त्यांनी लगावला.
रक्षा खडसेंच्या हॅट्रिकसाठी एकनाथ खडसे मैदानात –
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश झाला नसला तरी त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या हॅट्रिकसाठी आपल्या विविध पक्षातील समर्थकांसह रावेर तालुक्यात सावदा आणि फैजपूर परिसरात बैठका घेतल्याचे समजते. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबर रक्षा खडसे यांच्या पाठीमागे एकनाथ खडसे समर्थक जोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : महायुतीचे जागावाटप फायनल! कोणत्या मतदारसंघातून कोण लढतंय? वाचा, एका क्लिकवर