चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जामनेर (जळगाव), 26 मे : जळगाव जिल्ह्याच्या काही भागात काल शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दरम्यान, अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले असून राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर मतदारसंघातील मतदारसंघातील देऊळगाव, तोरनाळा, पळासखेडा काकर, गोरनाळा येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर माध्यमांसोबत संवाद साधताना मंत्री महाजन म्हणाले की, काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, राहत्या घरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. केळीच्या बागा अक्षरशः झोपल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांची छते उडून गेली असून, घरांची पडझड झाली आहे. मात्र, जीवित हानी कुठेही झालेली नाही.
नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश –
मंत्री महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी, तहसिलदार आणि कृषी अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काही जणांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली असून त्यांना लवकरच आर्थिक स्वरूपाची देखील मदत देण्यात येईल, असेही मंत्री महाजन म्हणाले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात तापमानाने उच्चांक केलेला असून नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मंत्री महाजन यांनी केले.
केळी बागांचे नुकसान –
गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने केळी बागा होरळपत असताना काल झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले. रावेर तालुक्यात 15 ते 16 गावांमध्ये केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. दरम्यान, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास वादळामुळे हिरावला गेला. तसेच घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले, केळी बागांना अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांचे नुकसान