जळगाव : अनेक शेतकरी कर्ज माफ होणार आहे म्हणून सोसायटीचं काढलेलं कर्ज भरतच नाहीत. म्हणून मग खूप अडचणी होतात. त्यामुळे एक-दोन वर्ष राज्याची अर्थव्यवस्था जरा व्यवस्थित झाली की त्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकार विचार करेल, असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले. जळगाव येथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
शेतकरी कर्जमाफीवर अजितदादांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते बोलत होते. सगळी सोंग करता येतात. पण पैशाचं सोंग नाही करता येत. आम्ही राज्यातील 13 कोटी जनतेचा विचार करतो. 31 मार्चच्या आत आपल्या पीककर्जाचे पैसे भरा. परिस्थितीनुरुप आम्ही पुढचे निर्णय घेऊ. आता तशा प्रकारची परिस्थिती नाही. त्यामुळे यावर्षी, पुढच्या वर्षीही घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा, असे
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते.
यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मला वाटतं दादा म्हणाले की, वर्ष-दोन वर्ष कर्जमाफी होणार नाही. दादा राज्याचे वित्तमंत्री आहेत. त्यांनी म्हटलं असेल तर त्याला कुठल्या गोष्टीचा आधार असेल आणि लाडक्या बहिणींमुळे 35-40 हजार कोटी रुपयांचं दायित्व आमच्यावर आलेलं आहे. त्यामुळे आता कर्जमाफी करावी त्यामुळे मग राज्याच्या तिजोरित खडखडाट होईल. पगार सुद्धा देणं मुश्किल होईल. त्यामुळे एक-दोन वर्ष राज्याची अर्थव्यवस्था जरा व्यवस्थित झाली की त्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकार विचार करेल.
अनेक शेतकरी कर्ज माफ होणार आहे म्हणून सोसायटीचं काढलेलं कर्ज भरतच नाहीत. म्हणून मग खूप अडचणी होतात. म्हणून त्यांनी सांगितलं की, सध्या शासनाकडे कर्जमाफीचा कुठलाही असा प्रस्ताव नाही. ज्यावेळी होईल, त्यावेळी निश्चित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.
शेतकरी कर्जमाफीवर काय म्हणाले होते अजित दादा?
दोन दिवसांपूर्वी बारामतीतील शिवनगर येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड याठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं नूतनीकरण, अनावरण समारंभ आणि शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते की, मी सभागृहात उत्तर देताना सांगितलं की, सगळी सोंग करता येतात. पण पैशाचं सोंग नाही करता येत. आम्ही राज्यातील 13 कोटी जनतेचा विचार करतो. आता अनेकजण म्हणत होते की, दादा मागच्या वेळी काहींनी जाहीरनाम्यात कर्जमाफी जाहीर केली आहे. आज 28 तारीख आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 मार्चच्या आत आपल्या पीककर्जाचे पैसे भरा. परिस्थितीनुरुप आम्ही पुढचे निर्णय घेऊ. आता तशा प्रकारची परिस्थिती नाही. त्यामुळे यावर्षी, पुढच्या वर्षीही घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा.