पाळधी (जळगाव), 14 मार्च : राज्यात सर्वत्र होळीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना आज धुलीवंदन मोठ्या उत्साहाने साजरे केले जात आहे. दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्यांच्या मूळ गावी अर्थात पाळतीतील बंजारा समाजातील बांधवांसोबत होळीचा आनंद घेतला. परंपरेप्रमाणे बंजारा समाज बांधव पारंपरिक होळी गीते गाऊन नाचून हा सण साजरा करत असतात. यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील त्यांच्या सोबत नाचून होळी सणाचा आनंद लुटला.
मंत्री गुलाबराव पाटील धुलीवंदनानिमित्त नेमकं काय म्हणाले? –
मंत्री गुलाबराव पाटील धूलीवंदनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले की, आपल्या देशात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः खेड्यात मोठ्या आनंदाने हा सण साजरा केला जातो. आज सकाळी बंजारा तांड्यात लहान-मोठ्यांसोबत मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जात आहे. ही रंगाची तसेच प्रेमाची होळी आहे. खरंतर, आपले कितीही वैर अथवा दुश्मनी असली तरी ते विसरून जाऊन या दिवशी सर्वजण होळीच्या रंगात तल्लीन होतात. यामुळे हे एक प्रेमाचे प्रतिक आहे.
दरम्यान, लाख कोशीश करो मेरा नाम मिटाने की मगर तुम मेरा नाम न मिटा पाओगे, क्योकी मेरे चाहने वाले मेरा नाम कागद पर नही दिल पर रखते है! अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
मंत्र्यांची गाडी दिसताच लहान मुलांची गाडीजवळ गर्दी –
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्यांच्या पाळधी या गावी बंजारा समाजातील बांधवांसोबत होळीचा आनंद साजरा केला. यावेळी धूलीवंदन साजरा करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील हे गावात येणार असल्याचे लहान मुलांना माहित होताच ते मुले मंत्री पाटील यांची वाट पाहत होते. अशातच त्या मुलांना मंत्र्यांची गाडी दिसताच त्यांनी गाडीजवळ जात एकच गर्दी केली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी लहान मुलांना चॉकलेट वाटप करत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रंगले रंगात; कुटुंबियांसह साजरी केली धूलीवंदन, पाहा Photos