मुंबई, 8 सप्टेंबर : पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याअंतर्गत पशुसंवर्धन सेवा ‘गट अ’ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
पशुधन विकास अधिकारी पदाची होणार भरती –
ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे. सुधारित आकृती बंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण 4684 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यःस्थितीत 1886 पदे भरलेली असून 2798 पदे रिक्त आहेत.
तसेच 31 डिसेंबर 2025 अखेर 8 पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत, असे एकूण 2806 पदे रिक्त होणार आहेत. ही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत होता. या गोष्टीची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री श्रीमती मुंडे यांनी पाठपुरावा करून पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय घेतला. यापैकी सरळसेवा जाहिरात क्र. 12/2022 मधील प्रतिक्षायादीतील 11 पदे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित 2795 पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कळविण्यात आले आहे. ही रिक्त पदे भरल्यानंतर विभागाचे कामकाज अधिक वेगाने होऊन ग्रामीण भागातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवांना चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा : देशात वक्फ दुरूस्ती विधेयक लागू; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, नेमकी बातमी काय?