नवी दिल्ली, 9 एप्रिल : देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेने 2 एप्रिल रोजी तर राज्यसभेत 3 एप्रिल रोजी सादर करण्यात आले होते. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेत ते विधेयक मंजुर झाल्यानंतर 5 एप्रिल रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर काल मंगळवारी 8 एप्रिलपासून हा कायदा देशभरात लागू झाला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. तर दुसरीकडे वक्फ विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण लागलंय.
देशात वक्फ दुरूस्ती विधेयक लागू –
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत तसेच राज्यसभेत वक्फ दुरूस्ती विधेयक मांडल्यानंतर ते मंजुर झाले. यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक देशभरात लागू करण्यात आले. यावरून सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झालेत. दरम्यान, दुसरीकडे वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यापासून, सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत तब्बल 12 याचिका दाखल झाल्या आहेत. तर दुसरीकडे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देखील 11 एप्रिलपासून देशभरात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण –
वक्फ दुरूस्ती विधेयकाविरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन करण्यात आले. दरम्यान, काल संध्याकाळी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शने सुरू असताना हिंसाचार झाला. यावेळी निदर्शकांनी अनेक वाहने पेटवून दिली. या वाहनांध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश आहे. तसेच निदर्शकांशी झालेल्या संघर्षात अनेक पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या गृहमंत्री ममता बॅनर्जी यांनी निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे किंवा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी केलीय.
वक्फच्या संपत्तीवरील दावा आणि व्यवस्थापनासंदर्भात तरतुदी –
जवाहर लाल नेहरू सरकारने 1954 मध्ये वक्फ अॅक्ट पास केला होता. तसेच 1995 मध्ये वक्फ अॅक्टमध्ये बदल देखील करण्यात आले होते. यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात वक्फ बोर्ड स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली होती. या कायद्यामध्ये वक्फच्या संपत्तीवरील दाव्यासंबंधी तसेच तिच्या व्यवस्थापनाबद्दल तरतुदी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आता केंद्र सरकारने वक्फ विधेयकात दुरूस्ती केल्या आहेत.
कायदा लागू झाल्यानंतर नेमका काय होणार बदल? –
केंद्र सकारच्यावतीने वक्फ कायदा लागू करण्यात आला असून या विधेयकात केलेल्या तरतुदींनुसार वक्फ बोर्डामध्ये गैर मुस्लिम आणि महिलांचा समावेश करणे, जिल्हाधिकाऱ्यांना संपत्तीचा सर्वे करण्याचा अधिकार देणे आणि वक्फ ट्रिब्युनलच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणे या तरतुदींचा समावेश असणार आहे. यामुळे हे विधेयक मंजूर झाल्याने कोणत्याही संपत्तीला जबरदस्तीने वक्फची संपत्ती घोषित करता येणार नाही.