चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 3 जुलै : राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेली बालसंगोपन योजना ही अत्यंत चांगली योजना आहे. आयुष्याच्या कठीण काळात साथ देणाऱ्या अशा चांगल्या योजनेत अनेक अशा पात्र लाभार्थ्यांना वेळेत अनुदान देण्यात उशीर होत आहे. यामुळे यावल-रावेर मतदारसंघातील अनेक पात्र लाभार्थ्यांचे अर्ज अद्याप प्रलंबित असून त्यांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात यावेत आणि गरजू बालकांना या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली. विधानसभेच्या सभागृहात औचित्याच्या मुद्यावर आज दुपारी अमोल जावळे बोलत होते.
अमोल जावळे काय म्हणाले? –
विधानसभेच्या सभागृहात बोलताना अमोल जावळे म्हणाले की, राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेली बालसंगोपन योजना ही अत्यंत चांगली योजना आहे. ज्या पाल्याचे आई किंवा वडील या दौघांपैकी कोणी मृत पावले असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अशा पाल्यांना शासनाकडून दर महिन्याला 2 हजार 250 रूपये दिले जातात.
आयुष्याच्या कठीणकाळात साथ देणाऱ्या अशा चांगल्या योजनेत अनेक अशा पात्र लाभार्थ्यांना वेळेत अनुदान देण्यात उशीर होत आहे. माझ्या यावल रावेर मतदारसंघातील यावल तालुक्यात मागच्या पाच आर्थिक वर्षांत बालसंगोपन योजनेसाठी 753 तर रावेर तालुक्यात 1 हजार 177 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये अंदाजे यावल 30 तर रावेर तालुक्यात 25 ते 27 टक्के अर्ज प्रलंबित आहेत.
दरम्यान, हेतुपुरस्पर उशिर करणाऱ्या अधिकाऱ्यांना बालसंगोपन योजनेच्या लाभ देण्यासाठी लवकारत लवकर प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आदेश देण्यात यावे तसेच गरजु पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा देण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी सभागृहात शासनाकडे केली.
काय आहे बालसंगोपन योजना? –
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यभर राबवली जाते. पालकांचा मृत्यू, गंभीर आजार, अपंगत्व, एकल पालकत्व किंवा नैसर्गिक आपत्ती अशा परिस्थितींमध्ये आलेल्या बालकांना संगोपनासाठी या योजनेतून दरमहा आर्थिक मदत दिली जाते.