चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 2 जुलै : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत पार पडत आहे. या अधिवेशनात विरोधक महायुती सरकारवर विविध मुद्यांवरून टीका करत आहेत. दरम्यान, आज माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी एसटी महामंडळाच्या बसचालकांच्या पगाराचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले बच्चू कडू? –
अधिवेशनात एसटी महामंडळाच्या बसचालकांच्या पगाराचा मुद्दा उपस्थित करत बच्चू कडू म्हणाले की, “विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या पाठीमागे असलेल्या भिंतीवर ‘सत्यमेव जयते’ लिहिले आहे. विधानसभा अध्यक्ष आणि भुसेंच्या कार चालकाला मिळत असलेला पगार एसटी कर्मचाऱ्याला का मिळत नाही? हे दादा भुसेंनी फक्त सांगावे. तुमचा चालक एसीमध्ये फिरतो. एसटीत बसले की माणूस घामाघूम होतो. कर्मचाऱ्यांचे कष्ट अधिक जास्त आहेत. मग, त्यांचा पगार का कमी आहे?, असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला.
View this post on Instagram
मग तुम्ही अन्याय का करत आहात? –
बच्चू कडू पुढे म्हणाले की, अन्याय करणाऱ्या अफजलखानचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोथळा काढला होता. मग तुम्ही अन्याय का करत आहात? सरकारच कायदा मोडत असेल, तर कुणाच्या थोबाडीत मारायचं? याचं सत्य आणि असत्य दादा भुसेंनी सांगितलं पाहिजे. तुम्हा राग का येत नाही? असा प्रश्न उपस्थि करत याची थोडी लाज वाटली पाहिजे,” अशा शब्दांत कडूंनी सरकरला खडसावले.
मंत्री दादा भूसे यांचे प्रत्युत्तर –
तसेच तुमच्या चालकाला 20 ते 30 हजार रूपये तुम्ही पगार देता. सगळ्यांची सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याला तुम्ही 12 हजार रूपये पगार देता, असेही बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, मंत्री दादा भुसे यांनी उभे राहत कडूंना सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, बच्चू कडूंचा मी आदर व्यक्त करतो. मी सुद्धा आक्रमक पद्धतीने उत्तर देऊ शकतो, असा दम दादा भुसेंनी कडू यांना भरला.
विधानसभा अध्यक्षांची मध्यस्थी –
बच्चू कडूंनी लाज हा शब्द वापरल्यामुळे राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करत सांगितले की, सभागृहाला एक परंपरा आहे. असंसदीय शब्दांबाबत नियम आहेत आणि आपल्या भावना व्यक्त करताना असंसदीय भाषा वापरणे चुकीचे ठरेल. बच्चू कडूंनी वापरलेली भाषा मी तपासून घेईल आणि त्यात असंसदीय शब्द वापरले असतील तर ते रेकॉर्डवरून काढले जातील.
हेही वाचा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: आधी कागदपत्रांची पुर्तता करा अन् अर्ज दाखल करा, प्रशासनाचे आवाहन