मुक्ताईनगर, 3 सप्टेंबर : “एक निवडणूक झाली त्यामध्ये एकाला प्रस्थापित केले आता दुसऱ्याला प्रस्थापित करण्याचा त्यांचा डाव आहे. म्हणून हे सरपटणारे अन् रंग बदलणारे प्राणी आहे,” अशी खोचक टीका मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता केली. ते मुक्ताईनगरात पत्रकारांसोबत बोलत होते.
आमदार चंद्रकांत पाटील काय म्हणाले? –
आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, एकीकडे भाजप तर दुसरीकडे राष्ट्रवादी असे दोघांचे विषय घेऊन चालायचे आणि फक्त कुटुंबापुरता विचार करायचा. परिस्थितीनुसार स्वतःची भूमिका घ्यायची. त्यांनी कधी मतदारसंघ पाहिला नाही. गेली 30 वर्ष तुम्हाला संधी दिली. मात्र, तुम्ही मतदारसंघाचा विकास केला का?, असा प्रश्न आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंबाबत उपस्थित केला.
संभ्रम निर्माण झालाय –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात जी घौडदौड सुरू आहे. ते पाहून चांगल्या-चांगल्यांचे हौश उडाले आहेत. त्यामध्ये यांना देखील समजत नाही की मी नेमकं कोणत्या पक्षात जावं. ते कधी सांगतात मी भाजपमध्ये तर कधी सांगतात राष्ट्रवादीमध्ये आणि म्हणून त्यांचातच संभ्रम निर्माण झाले असल्याचेही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ –
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील सध्या करत आहेत. विधानसभा निवडणूक 2019 साली भाजपचे तत्कालीन आमदार तथा जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना तिकीट नाकारत त्यांच्या कन्या रोहिनी खडे यांना भाजपने तिकीट दिले. तर दुसरीकडे राज्यात महायुती असल्याने चंद्रकांत पाटील हे शिवसेनेत असताना त्यांनी मतदारसंघाची जागा भाजपच्या वाटेला आल्याने अपक्ष निवडणूक लढवली आणि रोहिणी खडसे यांचा पराभव केला होता.
मुक्ताईनगरचे राजकारण तापणार –
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांची दावेदारी पक्की मानली जात असताना मुक्ताईनगरात पुन्हा एकदा राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांची बंदची हाक, जळगावसह जिल्ह्यातील बस आगारांची नेमकी काय परिस्थिती?