जळगाव, 3 सप्टेंबर : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यस्तरावरील 13 संघटनेची कृती समितीनं संपाची हाक दिली होती. त्यानुसार, आज संप पुकारला जातोय. या पार्श्वभूमीवर जळगावसह चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, भुसावळ तसेच चोपडा, इत्यादी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
जळगावसह जिल्ह्यातील बस आगारांची नेमकी काय परिस्थिती? –
जळगाव शहरातील बस आगार हे आज पुर्णतः बंद असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ हे बस आगार देखील बंद असल्याचे समोर आलंय. तसेच पारोळा आणि चोपडा, भडगाव, इत्यादी ठिकाणचे बस आगार अंशतः सुरू आहे.

काही प्रवाशी या बसस्थानकांवर तात्कळत बसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे देखील चित्र दिसून येत आहे तर काही ठिकाणी शुकशुकाट आहे.

एसटी कर्मचारी काय म्हणतात? –
चाळीसगाव बस आगारातील बसचालक विजय शर्मा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आमच्या प्रलंबित मागण्या पुर्ण व्हाव्यात यासाठी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगार हे आज सकाळी 4 वाजेपासून बंद आहे. शासनाकडे आम्ही वेळोवेळी आमच्या मागण्यांचा पाठपुरावा केलाय. मात्र, शासनाने त्या मागण्या पुर्ण न करत त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी आजपासून आम्ही एसटी कर्मचारी धरणे आंदोलन करत आहोत. या बंदला अनेक प्रवाशी संघटनांनी पाठिंबा दिलाय. दरम्यान, वरिष्ठ पातळीवर चर्चा करून आमच्या प्रलंबित मागण्या पुर्ण कराव्यात, असेही ते म्हणाले.

बस बंद असल्याने शाळेतील विद्यार्थांना शाळेत जाण्यात अडचणी निर्माण झाल्या आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सरकारने पुर्ण कराव्या, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

एसटी संपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलवली बैठक –
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा संप मागे घ्यावा व त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली आहे. उद्या, सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार असून मुख्यमंत्री शिंदे एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते. दरम्यान, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपला सुरूवात झाली असताना जोपर्यंत मुख्यमंत्री आंदोलनाबाबत भूमिका घेत नाहीत तोवर आंदोलन सुरू राहणार असल्याची कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना फटका –
एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आजपासून (3 सप्टेंबरपासून) एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या काय आहेत मागण्या? –
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे.
- वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप करावे.
- नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत.
- 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी.
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ मिळावी.
- 58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळावी.
- 57 महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी मिळावी.
- प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक मिळावा.
हेही वाचा : खान्देश, मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा जोर कायम! जळगाव जिल्ह्याचा ‘असा’ आहे आजचा हवामान अंदाज