मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 9 फेब्रुवारी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील आदिवासी आश्रम शाळेत आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी आश्रम शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी “संवाद चिमुकल्यांशी” अभियान राबविण्यात येत आहे.
आमदार चंद्रकांत सोनवणे यांची विष्णापुर शासकीय आश्रम शाळेत भेट –
राज्य सरकारच्या “संवाद चिमुकल्यांशी” या अभियानांतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा तालुक्यातील विष्णापूर शासकीय आश्रम शाळा येथे भेट देऊन येथील विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेत विद्यार्थ्यांसोबत भोजन केले.
यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नियमित देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय, स्नानगृहाची स्वच्छता, शालेय इमारत व वस्तीग्रह स्वच्छता, विद्यार्थ्यांना आंघोळीला गरम पाणी देण्यात येते किंवा नाही कशा प्रकारे पाणी दिले जाते, इत्यादी बाबींची सखोल तपासणी करून कर्मचाऱ्यांना त्रुटीबद्दल सुधारण्यासंदर्भात सूचना केल्या.
समस्यांसदर्भात आदिवासी मंत्र्यांना अहवाल सादर करणार –
याोबतच आदिवासी आश्रम शाळेचे विद्यार्थ्यांसोबत भोजन करून थंडगार हवेत शेकोटी पेटवून शेकोटीच्या बाजूला बसून “चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद” केला. विद्यार्थ्यांना काही अडचणी आहेत का? शिक्षक व्यवस्थित शिकवत आहेत का? भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे? या संदर्भात देखील त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी व यावल येथील प्रकल्प अधिकारी व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक यांना आश्रम शाळेबद्दल असणाऱ्या समस्या व त्या कशा सुधारता येतील या संदर्भात आदिवासी विकास मंत्री यांना अहवाल सादर करणार असल्याचे देखील यावेळी आमदार सोनवणे यांनी सांगितले.मुलांसोबत मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारल्या – प्रा. चंद्रकांत सोनवणे
“संवाद चिमुकल्यांशी” अभियानांतर्गत विष्णापुर शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांची स्वप्न नेमकी काय आहेत, याबाबत विचारणा केली. तसेच आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी धडपडणाऱ्या प्रयत्नांची आवश्यकता असते. प्रयत्न केल्याशिवाय कुठलेही यश मिळत नाही, अशापद्धतीचे विचार त्यांच्यासमोर मांडले आणि मुलांसोबत मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारल्या, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार पंचायत समिती संचालक रावसाहेब पाटील, सूर्यभान पाटील, विजय पाटील, गोपाल पाटील, शिवराज पाटील, किरण देवराज व प्रताप अण्णा पाटील उपसरपंच आडगाव, यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, गणेश पाटील सरपंच मालखेडा, गजानन कोळी उपसरपंच वडती, संजय सोनवणे माजी सरपंच विष्णपूर, रवींद्र पाटील, सतिलाल धनगर, मंगल इंगळे, उदयभान इंगळे, रावसाहेब पाटील, अमोल शेटे, किरण निंनायदे, अरुण लांडगे, दीपक महाजन तसेच विष्णापुर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक , कर्मचारी व विष्णपूर गावातील नागरिक आदी उपस्थित होते.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत