कल्याण (ठाणे), 3 फेब्रुवारी : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर काल मध्यरात्री गोळीबार केला. याप्रकरणात गणपत गायकवाड यांना न्यायालयाने 11 दिवसांची म्हणजेच 14 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
गणपत गायकवाड यांना पोलिस कोठडी –
गोळीबाराप्रकरणी उल्हासनगर न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश –
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोळीबार प्रकरणावर माध्यमांसोबत प्रतिक्रिया व्यक्त केली. ही गोळीबार झालेली घटना गंभीर असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका –
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उल्हासनगरातील गोळाबार प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पटोले म्हणाले की, पोलिसांवर भयानक दबाव आहे. कायद्याने कुठल्याही पोलिसांनी कामे करु नये, अशा पद्धतीचे दबाव तंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून वापरले जात आहे. आम्ही या सगळ्या बाबींचा निषेध व्यक्त करतो. या सरकारला थोडीशी जनाची नाही तर मनाची लाज असेल, तर यांनी राजीनामा द्यावा. सरकारने सत्तेच्या बाहेर जावे ही भूमिका काँग्रेस पक्षाची असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
काय संपूर्ण प्रकरण? –
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाला. यावरून संतप्त झालेल्या आमदार गणपत गायकवाड यांनी महेश आणि त्यांच्या समर्थकावर गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड आणि त्यांच्या एका समर्थकाला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर असून त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झाले आहेत.
हेही वाचा : मोठी बातमी! भाजप आमदाराकडून गोळीबार, ठाणे जिल्ह्यात नेमंक काय घडलं?