ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 13 जून : पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे 11 जून रोजी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामध्ये केळी बाग तसेच पपई, मोसंबी तसेच लिंबू या फळबागांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळतंय. दरम्यान, जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ, पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाचोरा-भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
यावेळी तहसिलदार विजय बनसोडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मधूकर काटे, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे, भाजप शिवसेनेचे पदाधिकारी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे येथे नुकसानीची पाहणी केल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, गेल्या 25 वर्षांपासून आम्ही कोणीही पाहिलेले नाही, असं भयानक वादळ या पाचोरा-भडगाव तालुक्यात आलं. विशेषतः पाचोरा-भडगाव तालुक्यात केळी, मोसंबी, लिंबु तसेच पपई या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर खासदार स्मिता वाघ, माजी आमदार दिलीप वाघ, प्रांताधिकारी, तहसिलदार, तलाठी तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच तसेच ग्रामस्थांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार –
पाचोरा-भडगाव तालुक्यातील किमान 6-7 शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. खरंतर, हातातोंडाशी आलेला घास एका क्षणातच वादळाने हिरावून नेला यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर याचे दुःख आहे. दरम्यान, या संकटाला शेतकरी वाचवू शकत नाही. पण शेतकऱ्याच्या या संकटात आम्ही सर्व सहभागी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार –
वादळी पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे तात्काळ निवेदन देऊन मतदारसंघात झालेल्या नुकसानीची माहिती बैठकीच्या माध्यमातून त्यांना देऊ, असे आश्वासन आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले. दरम्यान, वादळामुळे वीजेच्या पोलचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने गेल्या 48 तासांपासून वीजेच्या समस्यांचा सामना करावा लागत असून लवकरात लवकर वीज प्रवाह देखील सुरळीत करण्यात येईल, असेही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.