पाचोरा, 22 फेब्रुवारी : समाजाला सुधारायचे असेल तर, समाजाला दिशा द्यायची असेल तर नेमकी समाजाची गरज काय आहे, त्या दिशेने आपण जायला हवे, असे प्रतिपादन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. इतकंच नव्हे तर एक लोकप्रतिनिधी म्हणून, मित्र म्हणून आणि या भूमिचा सुपूत्र म्हणून आपल्या या कार्यात आपल्यासोबत 1 हजार टक्के पाठिंबा द्यायला तयार आहे. तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे, अशी ग्वाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.
सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचा द्वितीय वर्धापन दिनाचा कार्यक्रम काल पाचोरा शहरातील महालपुरे मंगल कार्यालय याठिकाणी संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निवृत्ती गायकवाड हे होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाला प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, पाचोरा नायब तहसिलदार विनोद कुमावत, भडगावचे नायब तहसिलदार रमेश देवकर, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हा परिषद सदस्य मधुकाटे, पाचोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्वीय सहायक स्वप्निल येवले उपस्थित होते. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासोबत इतर मान्यवरांनीही यावेळी आपली मते मांडली.
काय म्हणाले आमदार किशोर आप्पा पाटील –
मी सर्वात आधी या चॅनेलला शुभेच्छा देतो. आपलं अभिनंदन करतो आणि खरंच मनापासून सांगतो, मी आपल्या पाचोरा तालुक्यात जे निवडणुकीच्या काळात पाहिलं, माझं कौतुक केलं म्हणून सांगत नाही तर तुमचं चंद्रकांत भाऊंचं मी मनापासून अभिनंदन करतो की, त्यांनी माझी एकदा मुलाखत घेतली आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की, खरा पत्रकार आहे.
पंतप्रधान नरेंद्र हे पत्रकार परिषद घेत नाही. पत्रकारांच्या समोर ते अजूनही का जात नाहीत, असा प्रश्न पडल्यावर लक्षात यायचं की, पत्रकार काहीही विचारतात. पण खरंच चंद्रकांत जी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. कौतुक करतो. भारतातील हे पहिले पंतप्रधान असतील, जे 15 वर्षात कधीही पत्रकारांच्या समोर गेले नाहीत. पण आपल्या सर्व घटना कव्हर करायला पत्रकारांना आणि न्यूज चॅनेलला भाग पाडले, हे मोदीजींचं कौतुक करावसं वाटतं.
आज जर तपासले की, खरे अधिकृत असलेले पत्रकार किती, वार्ताहर किती, प्रतिनिधी किती, याची यादी पाहिली तर बोटावर मोजण्याइतकेच आहेत. पण आमंत्रित केले तर हॉलही अपूरा पडतो. मी मोदीजींचं यासाठी उदाहरण दिलं की, का पत्रकारांसोर जावं. त्यांना तो पश्चात्ताप असावा. पत्रकारितेत समाजाला सुधारण्याचा विडा आम्ही उचलला आहे, याच्याकडे आम्ही बघणार आहोत की नाही. पत्रकारिता म्हणून नेमकं काय आहे, अनेक समस्या हे आम्ही समाजासमोर दाखवणार आहोत की नाही, असा सवालही त्यांनी केला.

न्यूज चॅनेल वाल्यांमध्येही प्रचंड स्पर्धा आहे, यामध्ये आपल्याला आता डोळस होणं अत्यंत गरजेचं आहे. आज अशी परिस्थिती आहे की, 50 एकरवाल्याच्या मुलाला मुलगी मिळत नाही आणि मुंबईमध्ये 15 हजार रुपयाची नोकरी करणाऱ्या ज्याचा घडभाडं 7-8 हजार आहे, त्याचा किराणा 10 हजार रुपये आहे त्याला मुलगी दिली जाते. या लोकांना आपण का परावृत्त करू शकत नाही. आम्ही जे काही न्यूज चॅनेल घेऊन चालतोय.
प्रत्येक गावात अविवाहित तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 20-25 एकर जमीन असूनही मुलगी मिळत नाही आणि असे अनेक मुले आहेत, ज्यांना 10-15 हजाराची मुंबईत नोकरी करतोय, म्हणून 50 एकरचा मालक त्याच्या मुलीला तिथे देत आहेत. आणि 2-4 वर्षात त्यांचा घटस्फोट होतो. असे अनेक विषय आहेत. आज प्रचंड स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने समाजाला सुधारायचे असेल तर, समाजाला दिशा द्यायची असेल तर नेमकी समाजाची गरज काय आहे, त्या दिशेने आपण जायला हवे, असे आमदार किशोर पाटील म्हणाले. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार तसेच आदर्श शेतकरी सुनील पाटील, राजूरी येथील प्रवीण पाटील आणि बांबरूड राणीचे येथील आदर्श शेतकरी मयुर वाघ यांचेही कौतुक केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आमचं इतकं दुर्दैवं आहे की, आता अशी परिस्थिती आहे की, एका बाजूला सांगतात की, सर्व काम झालीच पाहिजेत. दुसऱ्या बाजुला प्रशासकीय अधिकारी. प्रत्येक शासकीय कामातून रॉयल टी कापली जाते. घरकुलांसाठी वाळू लागते. घरांसाठी वाळू लागते. पण आमची धोरणं चुकीची आहेत. अर्थात मी मुख्यमंत्री नाही किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री नाही. एक साधा आमदार आहे. नक्की आमची धोरणं चुकतात, असे म्हणत सरकारच्या चुकीच्या धोरणं तुम्ही दाखवावीत, असेही ते यावेळी म्हणाले.
मी अनेकदा अधिवेशनात याबाबत बोललो आहे. पूर्ण महाराष्ट्राचा जर समतोल राखायचा असेल तर पूर्वीची जी पद्धत होती, त्याप्रमाणे जर वाळू उचचली तर सर्व प्रकारच्या पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. आज अशी परिस्थिती आहे की, महाराष्ट्रात कुठेतरी 2-4 जिल्ह्यांत ठेका दिला जातो. त्या जिल्ह्यात ठेका जर 1 हजार रुपये असेल तर 25 हजार उचलला जातो. पूर्ण तळाशी जातो. तिथल्या पर्यावरणाचा पूर्ण ऱ्हास होतो आणि इतर ठिकाणी कुठेही वाळू उचलली जात नाही. त्यापेक्षा पूर्वीचं धोरण चांगलं होतं. पण त्याला कुठेतरी तिलांजली दिली जात आहे, अशा विषयांवरही आपण लक्ष दिलं पाहिजे, असे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
तसेच तालुक्यातील बेराजगारांसाठी एखादी कार्यशाळा आयोजित करावी आणि त्यांना तालुक्यातील जे यशस्वी असे कृषीतज्ञ आहेत, यांचे मार्गदर्शन मिळावे, या सर्वांचा आदर्श त्यांच्यासमोर मांडावा आणि ज्या पालकांची आणि मुलींची दिशाभूल होत आहे, ती आपल्याला थांबवता येईल का, खरा प्रामाणिक व्यावसायिक जो आपल्याला खरं आयुष्यभर वागू शकणार आहे का, तिला न्याय देऊ शकणार आहे का, अशांची फसवणूक आपल्याला थांबवता येईल का, असा विषय मी 8 दिवसांपूर्वीच घेतला आहे.
प्रा. राजेंद्र चिंचोले सरांच्या माध्यमातून आजपर्यंत हजार-दोन तरुण शिपाई पदापासून ते अधिकारी पदापर्यंत पोहोचले. मात्र, दोन दिवसांपूर्वी शिवजयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी खंत व्यक्त केली की, अजूनही परिसरातील तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत आहेत. त्यामुळे आपण लोकांना कशापद्धतीने सुधारण्याच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. कदाचित वर्ष-दोन वर्ष जातील, पण त्यात 100 टक्के यश मिळेल, असा विश्वासही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. इतकंच नव्हे तर एक लोकप्रतिनिधी म्हणून, मित्र म्हणून आणि या भूमिचा सुपूत्र म्हणून आपल्या या कार्यात आपल्यासोबत 1 हजार टक्के पाठिंबा द्यायला तयार आहे. तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे, अशी ग्वाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.

सुवर्ण खान्देश चॅनेलने फक्त बातम्या देण्याचे काम केले नाही तर लोकशाही मजबूत करण्याचेही काम केले – उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निवृत्ती गायकवाड –
या कार्यक्रमाला येण्याची जिल्हाधिकारी महोदयांची खूप इच्छा होती आणि त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. पण काही प्रशासकीय कामामुळे याठिकाणी जिल्हाधिकारी महोदय उपस्थित राहू शकले नाहीत आणि सरांनी मला याठिकाणी सांगितलं होतं की, आपण याठिकाणी जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे मला याठिकाणी आपल्यासमोर माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली.
सुवर्ण खान्देश मागच्या 2 वर्षात एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल म्हणून उभे राहिले आहे. केवळ बातम्या देण्याचं काम नाही तर त्यांनी तळागाळातील समस्या, विकासाच्या दिशा, प्रशासनाचे वेगवेगळे उपक्रम, शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणव्याचे काम त्यांनी याठिकाणी केले. राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांचे प्रश्न वेगळे असतात. परंतु आपल्या स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवरीलच न्यूज चॅनेल असणे किती आवश्यक आहे, हे आज आपल्यासमोर सुवर्ण खान्देशने दोन वर्षात केलेल्या कामगिरीवरुन दिसून आलेले आहे.
आज पत्रकारितेत मोठ्या प्रमाणात माध्यमे आहेत. सोशल मीडियाचाही स्फोट झाला आहे. पण विषयाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा सखोल अभ्यास करून ती बातमी प्रकाशित करणे, हे आजच्या काळात महत्त्वाचे आहे. आजच्या काळात ट्रायल मीडिया नावाची संकल्पनाही पाहायला मिळते. पण वस्तुस्थिती आणि समस्या, त्याचं मूळ काय आहे, हे पाहून बातमी देणे अपेक्षित आहे. जनतेच्या मनात आपल्या हक्कांविषयी जाणीव निर्माण करणं ही प्रसारमाध्यमांची भूमिका आहे.
आज 25 टक्के नागरिक हे निरक्षर आहेत. त्यांना आपल्या हक्काची जाणीव नसते. शासनाच्या विविध योजना असतील, नागरिकांच्या हक्कांची महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य या प्रसारमाध्यमांद्वारे केलेले आहे. आता मी चित्रफित पाहत असताना मागच्या 2 वर्षात सुवर्ण खान्देशने जी कामगिरी केलेली आहे, ती खरंच खूप समाधानकारक आहे. आपल्या ग्रामीण भागात एखादे न्यूज चॅनेल ओपन होणे आणि ती यशस्वीरित्या 2 वर्षे पूर्ण करणे, याला ग्रामीण भागात, स्पर्धेच्या युगात खूप महत्त्वाचे स्थान आहे. आज अनेक जण व्ह्यूजच्या मागे धावतात. पण बोटावर मोजण्या इतकेच चॅनेल्स ही वस्तूस्थिती विचारात घेऊन बातमीच्या मुळापर्यंत जाऊन त्याठिकाणी बातमी प्रकाशित करतात. त्यातील एक चॅनेल म्हणजे सुवर्ण खान्देश हे चॅनेल आहे.
आज संशोधनावर आधारित पत्रकारितेची खूप गरज आहे. घडलेल्या घटनेची माहिती देणे. हा पत्रकारितेचा हेतू नाही तर त्या घटनेच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर आणणे हे महत्त्वाचे आहे. मोठ्या शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील समस्या या वेगळ्या असतात. त्यांचे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यात पाणीटंचाई, रस्त्याच्या समस्या, शेतमालाचे दर, बेरोजगारी, शिक्षणाच्या संधी यांसारखे प्रश्न याठिकाणी बातमीच्या रुपाने प्रकाशित केले तर आपण समाजात जागरूकता निर्माण करू शकतो.
आता आर्टिफिशिअल इंजेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर पत्रकारितेत पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञान हे केवळ सोयीसाठी नाही. तर ते समाजाच्या प्रगतीसाठी पण असायला हवे. आधी बातम्यांचं सकलंन करायला वेळ लागायचा. मात्र, आता एआयच्या माध्यमातून कमी कालावधीत माहितीचं विश्लेषण जमा करू शकतो. ग्रामीण भागातील वाचक हे यांना जर काही भाषा सोडल्या, तर बाहेरच्या ज्या बातम्या आहेत त्या वाचणं सहज शक्य होत नाही. एआयच्या माध्यमातून हे भाषांतर वाचकाला शक्य होतं.
पत्रकारितेत नव्या संधी आणि धोकेसुद्धा आहेत. डिजिटल पत्रकारितेत आव्हानेही मोठी आहेत. त्यामध्ये सायबर हल्ले असतील, खोट्या माहितीचा प्रसार असेल किंवा डाटा चोरी यासारख्या समस्या भेडसावत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांइतकेच स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणे महत्त्वाचे आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे सुवर्ण खान्देश चॅनेलने याठिकाणी फक्त बातम्या देण्याचे काम केले नाही. तर लोकशाही मजबूत करण्याचेही काम केले आहे, या शब्दात उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्री. निवृत्ती गायकवाड यांनी यावेळी क्षेत्रीय न्यूज चॅनेलचे महत्त्व व आधुनिक पत्रकारितेची भूमिका यावर त्यांनी भाष्य केले. तसेच सुवर्ण खान्देश न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या.
दुसाने बंधूंनी चांगल्या पद्धतीने परिसरातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले – माजी आमदार दिलीपभाऊ वाघ
आता जी आपण चित्रफित पाहिली, त्या छोट्याशा चित्रफितमध्ये या चॅनेलने मागच्या दोन वर्षांपासून केलेली जागरुकता, त्यांची कर्तबगारी पाहायला मिळाली. अत्यंत चांगल्या पद्धतीने या चॅनेलने प्रगती केलेली आहे. या चॅनेलचे काम पाहणारे खुशाल आणि चंद्रकांत या दोघांनी चांगल्या पद्धतीने पाचोरा, भडगाव तसेच जळगाव जिल्ह्यात समाजपयोगी, लोकहिताचे काम करत परिसरातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले. यापुढेही त्यांच्याकडून अशीच सेवा याठिकाणी होत राहो, अशा शुभेच्छा माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी दिल्या.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पत्रकारितेच्या बाबतीत मोहिते साहेबांनी पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता याबाबत एक खंत व्यक्त केली. पण फक्त पत्रकारिताच नाही, तर सगळ्याच गोष्टींमध्ये फरक पडला. जुनी माणसं असतील किंवा जुनं राजकारण असेल, राजकीय, सिनेमा, पत्रकारिता किंवा शेती असेल, सगळ्याच क्षेत्रात बदल घडत गेले. जसं तुम्ही सांगितलं की, पत्रकारितेचा एक काळ उभा होता की, आर. आर. आबासारख्या माणसाने पत्रकारितेच्या दबाबामुळे राजीनामा दिला. मात्र, आता रोज मीडिया ट्रायल होऊनही राजीनामा दिला जात नाही. सगळ्याच चॅनेलला बातमी लावली की बीड जिल्ह्यातीलच बातम्या येतात. दुसऱ्या कोणत्याच बातम्या नाहीत. म्हणजे इतर महाराष्ट्रातील प्रश्नच नाही, अशी परिस्थिती आपल्या समोर दिसते. आका, फाका जोरदार मीडिया ट्रायल सुरू आहे. मात्र, काही परिणाम होत नाही. म्हणून स्थानिक पातळीवर जी पत्रकारिता आपण करतो, त्यात दुसाने बंधूंना मी अशी विनंती करेन की, शोध पत्रकारितेकडे लक्ष दिले पाहिजे. बातम्या देताना पडताळून घेतल्या पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आपली याठिकाणी राहील, असे म्हणत माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी शुभेच्छा दिल्या.
अशी माणसं पत्रकारितेत असली तर येणारा काळ हा सुगीचा असेल – प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते
प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यावेळी म्हणाले की, पत्रकार ही फार कठीण अवस्था आहे. पत्रकारांसाठी खूप कठीण काळ आहे. 2010 मध्ये मी श्रमिक आधार पत्रकार संघ स्थापन केला. त्यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि कृष्णा पाटलांचा एक श्रमिक पत्रकार संघ होता. त्यानंतरच्या काळापासून ते आतापर्यंत अनेक पत्रकार संघ स्थापन झाले आहेत. ज्यावेळी सायंकाळ दैनिक, दैनिक आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि त्यानंतर यूट्यूब चॅनेल या रस्सीखेचमध्ये जर आपण मागचा काळ पाहिला तर पत्रकारितेचं वजन हे खूप, ती ताकद खूप पॉवरफूल होती. पत्रकारितेत प्रचंड ताकद आहे.
पत्रकारितेच्या दबाबावून आर. आर. आबा, विलासराव देशमुख यासारख्या मान्यवरांना राजीनामा द्यावा लागला. कारण त्यावेळची पत्रकारिता हा पैशाविना चालायची. आता पत्रकारिता म्हणजे फक्त येऊ द्या आणि खाऊ द्या, अशी परिस्थिती झाली आहे. अशा परिस्थितीत व्हिडिओ क्लीप पाहिली त्यावरुन मला असं जाणवलं की, शशिकांत दुसाने, चंद्रकांत दुसाने यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि अशी माणसं पत्रकारितेत असली तर येणारा काळ हा सुगीचा असेल आणि आपण खरंच योग्य रस्त्याने जाऊ असे सांगत भविष्यात या सुवर्ण खान्देशचे सॅटेलाईट चॅनेलमध्ये रुपांतर व्हावे, या शब्दात दिलीप मोहिते यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
2 वर्षात सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने चांगले कार्य केले – प्रा. राजेंद्र चिंचोले
कोणत्याही राष्ट्राची संपत्ती ही त्या राष्ट्राचं ज्ञान, त्या राष्ट्राकडे असणारं विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्य असतं. भारतात ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्याची कमतरता नाही. पण त्यासाठी योग्य शिक्षण देणं गरजेचं आहे. आपलं शिक्षण हे ज्ञाननिष्ठ असलं पाहिजे, ज्ञान हे संस्कारनिष्ठ असलं पाहिजे, संस्कार हे संस्कृतीनिष्ठ असलं पाहिजे, संस्कृती ही विज्ञाननिष्ठ असली पाहिजे, विज्ञान हे राष्ट्रनिष्ठ असलं पाहिजे आणि राष्ट्र हे वस्तुनिष्ठ असलं पाहिजे. जर आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास करायचं असेल तर चांगलं शिक्षण, चांगलं ज्ञान, चांगलं विज्ञान, चांगलं तंत्रज्ञान, चांगल्या कौशल्याची गरज आहे आणि या सर्व गोष्टींना आवश्यक ते चांगल्या प्रसार माध्यमांची.
ज्यावेळी प्रसारमाध्यमे हे खऱ्या अर्थाने ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, कौशल्य आणि शिक्षणाचा प्रसार करतील, त्या दिवशी देशाचा विकास झाल्याशिवार राहणार नाही आणि मला खात्री आहे, आपल्या देशात काही न्यूज चॅनेल्स हे चांगल्याप्रकारचं काम करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे सुवर्ण खान्देश. सुवर्ण खान्देशचे चंद्रकांत दुसाने याचा मोठा भाऊ खुशाल दुसाने याला मी लहानपणापासून ओळखतो. लासगावसारख्या छोट्याशा गावात जन्मलेल्या आणि पत्रकारितेत त्याने अत्यंत चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्याने ईटीव्ही मराठी असेल ईटीव्ही भारत असेल, आयबीएन लोकमत असेल यामाध्यमातून त्याने अँकरिंग आणि एडिटोरिअल टीममध्ये मोठी भूमिका निभावली आणि हे सर्व करत असताना फक्त राज्यातीलच नाही तर देशातील मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या.
त्याचेच अनुकरण त्याचा लहान भाऊ चंद्रकांत हा करत आहे. त्याने सुवर्ण खान्देशच्या माध्यमातून मागच्या 2 वर्षात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने आपल्या समाजातील वेगवेगळ्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. आगामी काळातही त्यांच्या हातून समाजाचं, परिसराचं आणि राष्ट्राचं अत्यंत चांगल्या प्रकारचं वार्तांकन व्हावं, या शब्दात प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी शुभेच्छा दिल्या.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ यावेळी पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी तर आभार सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुसाने यांनी मानले. यावेळी सुवर्ण खान्देशचे मुख्य संपादक शशिकांत दुसाने, चंद्रकांत दुसाने यांचा लासगाव ग्रामपंचायतीच्या वतीने, पाचोरा पत्रकार संघाच्या वतीने, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला अपराध नियंत्रण संघटनेच्या पाचोरा टीमच्या वतीने, कल्पेश टीचे जगन्नाथ महाजन, एसएसआर ट्रेडर्सचे रकीब देशमुख सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.