ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 31 ऑगस्ट : अमोल शांताराम शिंदे या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्याला पोलीस संरक्षणात बाहेर काढण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधकांना प्रत्युत्तर देत सांगितले की, अमोल शांताराम शिंदे याचा उमेदवारी अर्ज दाखल होऊ नये म्हणून त्याला दम देत अमोल शिंदे यांच्या गुंडांनी तहसील कार्यलयात हैदोस घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर अमोल शांताराम शिंदे या उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षकांकडे केलेल्या तक्रारीनंतर सदर उमेदवाराच्या जीवीतास हानी होऊ नये म्हणून पोलिसांच्या संरक्षणात त्या उमेदवारास घरी सोडण्यात आले.
काय आहे संपुर्ण बातमी? –
पाचोरा-भडगाव विधासभा मतदारसंघात वैशाली किरण सुर्यवंशी आणि अमोल शांताराम शिंदे असे नामसाधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, डमी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर नावात सारखेपणा असलेल्या या दोन जणांचे अर्ज दाखल करुन घेताना प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या प्रक्रियेवर विरोधकांनी आक्षेप घेत याप्रकरणी आमदार किशोर पाटील यांच्यावर आरोप केले. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज त्यांच्या शिवालय या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत जोरदार टीका केली.
काय म्हणाले किशोर आप्पा पाटील? –
बाबासाहेबांच्या संविधानामुळे प्रत्येकाला निवडणुकीत अर्ज दाखल करण्याचा स्वतंत्र अधिकार आहे. मात्र, केवळ नावात सारखेपणा असलेल्या उमेदवारांनी निवडणुकीत अर्ज दाखल केल्यामुळे वैशाली सुर्यवंशी आणि अमोल शिंदे यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आणि त्यामुळे त्यांनी प्रचंड आकांडतांडव केले, असे प्रत्युत्तर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विरोधकांना दिले.
विरोधकांवर जोरदार टीका –
नावात सारखेपणा असताना एखाद्याने जरी उमेदवारी अर्ज दाखल केला असेल तर त्याचे काही चुकीचे असेल तर संबंधित उमेदवाराविरोधात न्यायालयात, उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात कायद्याने दाद मागता येऊ शकते. नामसाधर्म्य असलेले उमेवारी अर्ज केवळ पाचोऱ्यात पहिल्यांदा दाखल होत आहे का? संपुर्ण महाराष्ट्रासह देशात अशा पद्धतीचे उमदेवार अर्ज दाखल करतात. अशापद्धतीने उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर ज्याच्यात हिंमत असेल त्याने मैदानात यावे, चांगल्या पद्धतीने लढावे…जनता येत्या 20 तारखेला दूध का दूध पाणी करेल म्हणून विरोधकांच्या खोट्या भूलथापांना मी भीक घालत नाही, अशा शब्दात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, संपुर्ण मतदारसंघात 60 टक्क्यांत किशोर आप्पा आहे आणि 40 टक्क्यात उरलेले सर्व विरोधक आहेत, असे आमदार पाटील म्हणाले.
हेही पाहा : Video : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार?, थेट जनतेशी संवाद…