जळगाव, 12 मे: राज्यातील काही भागांमध्ये पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
मागील दोन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला. गेल्या काही दिवसांपासून पश्चिमी वादळामुळे राज्यातील विविध भागांत पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता गुजरात आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाटसदृश परिस्थिती निर्माण झाली असून राजस्थानातील काही भागांत धुळीची वादळेही दिसून येत आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होत असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ नोंदवली जात आहे.
दरम्यान, उत्तर-मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झाला आहे. रविवारी जळगाव येथे राज्यातील सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा १.८ अंशांनी अधिक असल्याचे हवामान विभागाने सांगितले. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट परिसरात सोमवारीही उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
उन्हापासून बचाव करत असताना नेमकी काय काळजी घ्याल? –
- भरपूर पाणी प्या; तहान लागली नसली तरी नियमित पाणी घेत राहा.
- घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा.
- शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळा.
- हलके, सैल आणि सूती कपडे परिधान करा.
- लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रव पदार्थ आहारात समाविष्ट करा.
- उन्हात जास्त वेळ राहिल्यास मधूनमधून सावलीत विश्रांती घ्या.
- बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करा.
- लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या.
- बंद गाडीत (car) कोणालाही, विशेषतः मुलांना, एकटे सोडू नका.
- उष्माघाताची लक्षणे (डोके दुखणे, चक्कर, उलट्या, अशक्तपणा) दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा: Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली






