बोरखेडा (चोपडा), 12 मे: चोपडा तालुक्यातील बोरखेडा येथील 22 वर्षीय युवकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चेतन कृष्णा पाटील असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ मे २०२६ रोजी चेतन पाटील यांना उष्माघाताचा तीव्र त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तातडीने गावातील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संबंधित डॉक्टरांनी उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
चेतन पाटील कृष्णा हिम्मत पाटील यांचा सुपुत्र होता. त्याच्या अकाली निधनामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्चात वडील कृष्णा हिम्मत पाटील यांच्यासह काका हंसराज दंगल पाटील, युवराज हिम्मत पाटील, जिजाबराव हिम्मत पाटील, शालीक हिम्मत पाटील असा मोठा परिवार आहे.
उन्हापासून बचाव करत असताना नेमकी काय काळजी घ्याल? –
- भरपूर पाणी प्या; तहान लागली नसली तरी नियमित पाणी घेत राहा.
- घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा.
- शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळा.
- हलके, सैल आणि सूती कपडे परिधान करा.
- लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रव पदार्थ आहारात समाविष्ट करा.
- उन्हात जास्त वेळ राहिल्यास मधूनमधून सावलीत विश्रांती घ्या.
- बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करा.
- लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या.
- बंद गाडीत (car) कोणालाही, विशेषतः मुलांना, एकटे सोडू नका.
- उष्माघाताची लक्षणे (डोके दुखणे, चक्कर, उलट्या, अशक्तपणा) दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा: Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली






