मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानपरिषद आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामगारांच्या समस्या मांडल्या. लोकांना एक-एक वर्ष पैसे मिळाले नाहीत, असे म्हणत कामगारांना त्यांचे पैसे कधी मिळणार असा सवाल त्यांनी यावेळी सरकारला केला.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे –
आमदार एकनाथ खडसे यावेळी विधानपरिषदेत म्हणाले की, नियम असा आहे की, मजुरांना त्यांची मजुरी ही 24 तासात मिळायला हवी. पण यात मजुरीचा कॉम्पोनन्ट आणि बांधकामाचा कॉम्पोनन्ट असे दोन भाग आहेत. यातल्या रोजगार हमी योजनेच्या संदर्भात तातडीने पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असताना केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकारने हा निधी खर्च करावा आणि केंद्राचा निधी आल्यावर तो राज्य सरकारकडे वर्ज करावा.
मात्र, लोकांना एक-एक वर्ष पैसे मिळाले नाही. हा महिन्या-दोन महिन्याचा प्रश्न नाही. वर्ष-वर्ष जर रोजगार हमीचे पैसे मिळत नसतील तर हे राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. राज्य सरकारने स्वत:च्या निधीतून हा पैसा खर्च करावा आणि केंद्राचा निधी आल्यावर तो वळता करावा. सरकार याबाबत निर्णय घेणार आहे का आणि रोजगार हमीचे वर्षानुवर्षे जे पैसे दिले गेले नाहीत, त्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार, असे प्रश्न एकनाथ खडसे यांनी मंत्र्यांना विचारले.
एकनाथ खडसेंना शिंदेंच्या मंत्र्यांनी काय उत्तर दिलं?
एकनाथ खडसेंच्या या प्रश्नावर राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन कॅबिनेट मंत्री भरत गोगावले म्हणाले की, खडसे साहेबांनी जो मुद्दा उपल्थित केला तो योग्य आहे. आपले पैसे आधी देऊन केंद्राकडून आल्यावर जमा करावेत, राज्य शासनाच्या वतीने हा प्रयत्न चालू आहे. ही तुमची मागणी आम्हाला मान्य आहेत. लवकरात लवकर याचा निर्णय करू, असे आश्वासन मंत्री गोगावले यांनी एकनाथ खडसे यांना दिले.
हेही वाचा – अखेर ठरलं!, एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला, शिवसेनेकडून खान्देशातील ‘या’ नेत्याला मिळाली मोठी संधी