मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबईमध्ये पक्षबांधणीच्या दृष्टीने नव्याने पदरचना करण्यात आली. यामध्ये मुंबईला शहरअध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष हे पद तयार करण्यात आले. आतापर्यंत पक्षात फक्त विभागाध्यक्ष हे पद होतं. यावर एक शहरअध्यक्ष आणि 3 उपशहराध्यक्ष ही पदे तयार करण्यात आली आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे यांची मुंबई शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. यानंतर कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शिव-सायन या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली. मुंबई उपनगर पश्चिम विभागाची जबाबदारी कुणाल माहिनकर यांच्याकडे देण्यात आली आणि पूर्व विभागाची जबाबदारी योगेश सावंत यांना उपशहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. या सर्वांनी नेमकं कसं काम करायचं आहे, त्यांच्या कामाचं स्वरुप काय असेल याबाबतची सर्व लेखी माहिती त्यांना दिली जाईल, असे राज ठाकरेंनी सांगितले.
अमित ठाकरेंना कोणती जबाबदारी मिळाली?
यासोबतच केंद्रीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून या प्रत्येक घटकाकडे बारकाईने रक्ष ठेवेल. त्यांच्याशी संवाद साधेल. यासाठी पक्षाच्या नेते बाळा नांदगावकर यांच्याकडे गट अध्यक्षांची जबाबदारी, नितीन सरदेसाई यांच्याकडे विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी, अमित ठाकरे यांच्याकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली आहे. या यादीत अविनाश अभ्यंकर, संजय चितळे, शिरीष सावंत असे बरेच लोक असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.
याचप्रमाणे ठाण्यातही केंद्रीय समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये अविनाश जाधव, अभिजीत पानसे, राजू पाटील, गजानन काळे, इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच आता आधी मुंबई आणि ठाण्यात केली आहे. यानंतर एप्रिल-मेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ही रचना लागू केली जाईल, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.
हेही वाचा – जळगाव माजी उपसरपंच खून प्रकरण : ‘राज्यातील सरपंच सुरक्षित नाहीत…’, एकनाथ खडसे संतापले