मुंबई, 23 मार्च : माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंबाबत मोठा दावा केला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबाबत मला त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे दोन फोन आल्याचे ते काल म्हटले होते. दरम्यान, आज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. याबाबत माझी उद्धव ठाकरे-मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चा झाली झाली. मात्र, त्यांनी नारायण राणे यांच्यासोबत कुठल्याही पद्धतीने फोनवर बोलणे झाले नसल्याचे मला सांगितले, असे राऊत यांनी स्पष्ठ केले. दरम्यान, राणेंचा दावा खोटा असल्याचे राऊतांनी म्हटलंय.
संजय राऊत काय म्हणाले? –
आज माध्यमांसोबत संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, माझी स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. नाराणय राणेंच्या दाव्याबाबत मी त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, त्यांनी याचा इन्कार करत असा कोणताही फोन यासंदर्भात नारायण राणेंना झालेला नाही आणि हे संभाषण झालेले नाही. यासोबतच मी मिलिंद नार्वेकर यांना देखील विचारणा केली. मी देखील कोणाला फोन लावून दिलेला नाही. आता नारायण राणे यांनी सांगितल्याप्रमाणे यातील जे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांनीच सांगतिले की अशाप्रकारचे कुठलेही संभाषण झालेले नाही.
दरम्यान, नारायण राणे हे कशाच्या आधारावर अशाप्रकारची वक्तव्य करताएत, ते समजून घेणं गरजेचे आहे. त्यांची प्रकृती बरी नाहीये का, यामुळे त्यांना थोडा पाहाव लागेल. कारण त्यांनी सत्तरी पार केली असून आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटतेय, असा खोचक टोला देखील राऊतांनी नारायण राणे यांना लावलाय.
…अन् उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंची सुटका केली –
संजय राऊत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर भाष्य केल्यानंतर, नारायण राणे यांना ज्यावेळी पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने उद्धव ठाकरेंना फोन आले होते. राणेंची प्रकृती बरी नसून त्यांना काही विकार असल्याने याचा त्यांना त्रास आहे. म्हणून त्यांना सांभाळून, घ्या असे त्यावेळी कुटुंबियांकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सांगून नारायण राणे यांची संध्याकाळपर्यंत सुटका करायला लावली होती.
यासोबतच नारायण राणेंसाठी केंद्रातून फोन आले होते. अमित शहांनी देखील उद्धव ठाकरेंना फोन केला होता. आमचे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना थोडं सांभाळून घ्याल, असे शहा ठाकरेंना म्हटले होते, असेही राऊतांनी सांगितले. आता या गोष्टी काढायच्या असतात का, मात्र, तुम्ही त्या गोष्टी काढल्या यामुळे आम्हाला हे सांगावे लागले. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचे. व्यक्तिगत चर्चा सुद्धा असा खोटा मुलामा देऊन पाच-दहा वर्षांनी बाहेर काढल्या जातात. मग असे काढायला लागलो तर प्रत्येकाचे कुठे ना कुठे संबंध असतात आणि चर्चा घडत असतात.
महाराष्ट्रात असे वातावरण कधीही नव्हते. राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात संवाद कायम होता. आणि महाराष्ट्रात कोणतीही कारवाई कुटुंबापर्यंत जात नव्हती किंवा कुटुंबाची बदनामी होत नव्हती. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी-अमित शहांचे राज्य आल्यानंतर दुर्दैवाने संपुर्ण देशात अशाप्रकारचे घाणेरडे राजकारण सुरू झाले असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय.
हेही वाचा : “दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंचे मला दोन फोन….मी सांगितलं की, तुमच्या मुलाला…” नारायण राणेंचा मोठा दावा