मुंबई, 22 एप्रिल : गेल्या तीन दिवसांपासून राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या युतीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अर्थात राज ठाकरेंनी युतीसाठी घातलेली साद आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद हे कारण युतीच्या चर्चांना कारणीभूत ठरलंय. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलंय.
संजय राऊत काय म्हणाले? –
संजय राऊत आज सकाळी माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, राज ठाकरे हे मुंबईत नाहीयेत. ते कुठे गेलेले आहेत हे मला माहित नाहीये. पण राज ठाकरेंनी युतीसाठी नक्कीच एक हात पुढे केलाय आणि उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला. यामुळे काही दिवस जाऊ द्या. राज ठाकरे हे मुंबईत नाहीयेत. त्यांना मुंबईत येऊ द्या आणि त्यानंतर युतीबाबत चर्चा करू. लोकांच्या मनातील या भावना आहेत. दरम्यान, राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा युतीचा विषय हा जिवंतच राहणार, असेही राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक –
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात जे नातं आहे, त्या नात्यात कोणाची गरज नाहीये अर्थात कुणी येऊन त्यामध्ये चर्चा करावी अशी गरज नाही. राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात आणि उद्धव ठाकरे हे कमालीचं सकारात्मक आहेत. महाराष्ट्राचं तसेच मराठी माणसाचं आपल्याकडून नुकसान होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरेंची भूमिका ही कमालीची सकारात्मक असल्याचे राऊत म्हणाले.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे परदेशात –
राज ठाकरेंना महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी राज ठाकरेंनी युतीबाबत साद दिली. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी देखील एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंसोबतच्या युतीला प्रतिसाद दिला. मात्र, संपुर्ण महाराष्ट्रात राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत चर्चा सुरू आहेत. असे असताना राज ठाकरे हे परदेशात असून येत्या 29 एप्रिलला ते मुंबईत परतणार आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे देखील परदेशात असून 4 मे रोजी ते मुंबईत येणार आहेत. दरम्यान, दोघं नेते मुंबईत आल्यानंतर युतीबाबत हालचालींना वेग येणार असल्याचे सांगितले जात आहे.