मुंबई, 9 मे : पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर गोळीबार केलेल्या गोळाबारात मुंबईचा जवान शहीद झालाय. मूळच्या आंध्रप्रदेश राज्यातील आणि सध्या मुंबईतील घाटकोपर येथे वास्तव्यास असलेल्या सैन्य दलाच्या जवानास वीरमरण आलंय. मुरली नाईक असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात मुंबईचा जवान शहीद –
पाकिस्तानकडून सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जात असून पाक सैन्याचे रेंजर्स आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरू आहेत. मात्र, पाकच्या कुरापतींना उधळून लावत असतानाच दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामध्ये मुरली नाईक यांचा समावेश असून त्यांना सीमेवर वीरमरण आलंय. आज 9 मे रोजी पहाटे 3.00 वाजता झालेल्या पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात मुरली नाईक यांना वीरमरण आल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांना देखील पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले.
शहीद जवान मूळचा आंध्रप्रदेशातील राहणारा –
जम्मू-काश्मीरजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात घाटकोपरच्या कामराज नगरमधील रहिवासी मुरली श्रीराम नाईक हे जवान शहीद झाले. मूळचे आंध्रप्रदेश राज्यातील रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली. त्यामुळे सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला राहण्यास गेले आहे.
दरम्यान, आज मुंबईतील घाटकोपर वार्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले असून त्यांना स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी वाहली श्रद्धांजली –
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ‘एक्स’ पोस्ट करत करुन शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाईक हे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवाशी असून देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, नाईक कुटुंबीयांप्रती सहवेदना आहेत, असे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटलंय.
हेही वाचा : जम्मूच्या सांबामध्ये 7 अतिरेक्यांचा खात्मा; बीएसएफची जबरदस्त कामगिरी