नंदुरबार, 31 जानेवारी : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर- पुणे बसचा आज दुपारी कोडाईबारी घाटात अपघात झाल्याची घटना घडली. रस्त्यावर पुढे चालत असलेल्या मालवाहू गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 20 ते 22 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे संपुर्ण घटना? –
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आगारमधून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पुणे जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. दरम्यान, नवापूर बसस्थानकातून सुटलेली बस धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरून नवापुर, विसरवाडी, चिंचपाडा येथील प्रवासी घेवुन जात कोंडाईबारी घाटात आल्यानंतर उभ्या असलेल्या मालट्रकला मागून जोरदार धडक दिली.
बसमधील 20 ते 22 प्रवासी जखमी –
नवापूर- पुणे बसचा अपघात आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडला. या बसमधील 20 ते 22 प्रवासी जबर जखमी झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना दहिवेल, साक्री आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी कोंडाईबारी महामार्ग सुरक्षा पोलीस, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तत्काळ दाखल होत त्यांनी ताबडतोब महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. बस चालक मोबाईलवर बोलत असताना समोर दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमी झालेल्या प्रवाशांनी दिली.
हेही वाचा : मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीफचे 3 जवान शहीद