मुंबई : फॉरेन्सिक सायन्सच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रात राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसची (National Forensic Sciences University campus) स्थापना केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे राजपत्र शेअर करत याबाबतची माहिती दिली.
भारतात तीन नवीन ठिकाणी या कॅम्पसची स्थापना केली जाणार आहे. यामध्ये नागपूर (महाराष्ट्र), रायपूर (छत्तीसगड) आणि खोरधा (ओडिशा) येथे स्थापन केलेल्या कॅम्पसमध्ये राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे कॅम्पसचा समावेश केला जाईल, असे राजपत्रात म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्राने शिक्षण आणि तांत्रिक प्रगतीमध्ये उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाची (National Forensic Sciences University campus) घोषणा केल्याबद्दल माननीय पंतप्रधान आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांचे खूप खूप आभार. फॉरेन्सिक सायन्स उपक्रमांमध्ये महाराष्ट्राने आधीच पुढाकार घेतला आहे आणि हे विद्यापीठ कॅम्पस निःसंशयपणे शोध विज्ञान वाढवेल, मानवी संसाधने सुधारेल आणि आपल्या देशाची न्यायवैद्यक क्षमता मजबूत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील दुसरे विद्यापीठ –
याआधी महाराष्ट्रात पुण्यात राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. आता पुण्यानंतर नागपूर येथे हे महाराष्ट्राचे दुसरे राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ असेल. या माध्यमातून फॉरेन्सिक विज्ञान शिक्षणाचे केंद्र म्हणून राज्याचे स्थान मजबूत होणार आहे.
नवीन कॅम्पसमध्ये सुरुवातीला फॉरेन्सिक सायन्स, सायबर स्टडीज आणि गुन्ह्यातील घटना तपासण्याचे प्रमुख अभ्यासक्रम असणार आहेत. त्यानंतर येत्या काही वर्षांत फॉरेन्सिक तंत्रज्ञान आणि गुन्हेगारी बुद्धिमत्तेतील इतर अत्याधुनिक डोमेनमध्ये विस्तार करण्याच्या योजना आहेत.
याठिकाणी अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि आघाडीच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश असलेल्या फॅकल्टीसह, NFSU कायद्याची अंमलबजावणी, सायबर सुरक्षा आणि फौजदारी न्याय प्रणालीमधील फॉरेन्सिक तज्ञांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी फॉरेन्सिक संशोधन आणि व्यावसायिक प्रशिक्षण वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. नागपूर या कॅम्पसच्या स्थापनेमुळे विदर्भ आणि त्यापुढील विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधींना चालना मिळेल. तसेच उच्च दर्जाचे फॉरेन्सिक शिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहे.