ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच लोकसभा खासदार अमोल कोल्हे हे शिवस्वराज यात्रेनिमित्त जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त त्यांनी आज पाचोऱ्यात भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधत राष्ट्रवादीला अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि दिलीप दादांना (माजी आमदार दिलीप वाघ) तुमचं सगळ्यांचे पाठबळ आणि आशिर्वाद मिळावेत, असे आवाहन त्यांनी केले.
पाचोऱ्यात जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? –
जयंत पाटील म्हणाले की, आयुष्यात चढ-उतार राजकारणात असतात. कधी यश असतं तर कधी अपयश असतं. अपयशाने खचायचं नसतं तर यश मिळाल्याने हुरूळून जायचं नसतं. हा जीवनाचा प्रवास दिलीप दादा काही वर्षापासून करताएत. बोलत नाहीत. सहन करताएत. परिस्थिती बदलली की, परिस्थितीतूनही सुटण्याचा प्रवास त्यांना केलाय. आजपर्यंत तुम्हाला त्यांनी आणि तुम्ही त्यांना साथ दिलीय. दरम्यान, तालुक्यात राष्ट्रवादीला अधिक भक्कम करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत. हे प्रयत्न करत असताना दिलीप दादांना तुमचं सगळ्यांचे पाठबळ आणि आशिर्वाद मिळावेत, असे आवाहन जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी यांना केले.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत
जयंत पाटील पुढे म्हणाले की, मधल्या काळात पक्षात फूट पडली. यामध्ये काही आमदार गेले असतील. मात्र, राज्यातील राष्ट्रवादीचे 80 टक्के कार्यकर्ते आणि जनता ही पवार साहेबांसोबतच आहे. दरम्यान, दिलीप दादांच्या मागे असलेली ताकद ही आम्ही पवार साहेबांना (शरद पवार) सांगण्याचा प्रयत्न करू, असेही पाटील म्हणाले.
…अन् उपस्थितांमध्ये हशा पिकला –
आमच्या शिवस्वराज्य यात्रेत वेळ कमी असल्यामुळे आणि आचारसंहिता कधीही लागू शकतो. यामध्ये जिल्ह्यातील इतर मतदारसंघ वगळून तीनच मतदारसंघ निवडले आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी असे वक्तव्य करताच वगळल्याचा अर्थ दुसरा काढला जाईल, असे सतीश पाटील यांनी जयंत पाटील यांच्या लक्षात आणून देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. यानंतर जयंत पाटील यांनी पाचोरा, पारोळा आणि जळगाव हा विधानसभा मतदारसंघ शिवस्वराज्य यात्रेच्या सभांमधून वगळला असल्याचे स्पष्ठ केले. मात्र, आचारसंहिता लागल्यावर याठिकाणी आम्ही पुन्हा जाणार आहोत, असेही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीची (शरद पवार गट) शिवस्वराज्य यात्रा –
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. दरम्यान ही शिवस्वराज्य यात्रा आज जळगाव जिल्ह्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, मेहबूब शेख तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तसेच बोदवड येथे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
हेही वाचा : वंचितची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवाराला रावेरमधून मिळाली संधी