नवी दिल्ली, 23 जुलै : गेल्या काही दिवसांपासून नीट या मेडिकल क्षेत्रातील शिक्षणाच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या परिक्षेचा कथित घोटाळा समोर आला. यामध्ये परिक्षेच्या कार्यपध्दतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र, हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आणि यातच आता वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊ पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.
नीटबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय –
कथित नीट घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत कोर्टाने मोठा निकाल दिलाय. नीट यूजीची फेरपरीक्षा होणार नाही. मात्र, (एनटीएला) निकाल पुन्हा जाहीर करावे लागणार आहेत, असा महत्वपुर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. नीट परीक्षेचे पावित्र्य पूर्णपणे भंग झाले नाही, असे आम्हाला वाटते. तसेच गेल्या तीन वर्षांचे आकडे देखील आम्ही तपासले, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना सांगितले.
न्यायालयाने काय म्हटलंय? –
नीट परिक्षाप्रकरणावर दाखल करण्यात आलेल्या एकूण 40 याचिकांवर सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे आज ही सुनावणी झाली. नीटची फेरपरीक्षा घेऊ नये, अशी एनटीए आणि केंद्र सरकारची भूमिका होती. यावरून सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, तपास अद्याप अपूर्ण आहे – 4750 केंद्रांपैकी कुठे अनियमितता आहे, याचे उत्तरही आम्ही केंद्राकडे मागवले होते. मात्र, आयआयटी मद्रासनेही या प्रकरणाचा आढावा घेतला असून आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे परीक्षेचे पावित्र्य पूर्णपणे भंग झाले नाही, असे आम्हाला वाटते.
नेमकं प्रकरण काय? –
मेडिकल क्षेत्रातील शिक्षणाच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या नीट यूजी परीक्षेचे आयोजन 571 शहरांमधील 4 हजार 750 केंद्रांवर करण्यात आले होते. त्याशिवाय परदेशातील 14 शहरांमध्येही ही परीक्षा आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, यंदा नीट परीक्षेचे पेपर फुटले होते. दरम्यान, परीक्षेच्या संचालनामध्ये काही त्रुटी राहून गेल्याचे सांगत पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. याबाबत सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायलयाने याबाबत आज अंतिम निर्णय दिला आहे.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, पिक विमाधारकांसाठी 523 कोटीच्या निधीस मान्यता