अमरावती, 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 12 पद्म पुरस्कार जाहीर झाले असून यात 6 पद्मविभूषण तर 6 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये अमरावती जिल्ह्यातील अनाथांचे नाथ अशी ओळख असलेले जेष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
शंकबाबा पापळकर यांना पद्मश्री –
बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
शंकरबाबा पापळकर यांचे समाजकार्य –
अमरावती जिल्ह्यातील वझर येथील त्यांचे अंबादास पंत वैद्य अपंग मुलांचे आश्रम आहे. सुप्रसिद्ध समाजसेवक शंकरबाबा पापळकर या अनाथांच्या नाथाने वझ्झर येथे राज्यभरातील बेवारस दिव्यांगांना आश्रय दिला आहे. शंकर बाबा पापडकर हे 90 च्या दशकापासून अनाथ अपंग मतिमंद व दिव्यांग मुलांसाठी काम करत आहेत.
बेवारस मुलांचे केले संगोपन –
शंकर बाबा पापळकर यांनी आतापर्यंत रेल्वे स्टँड, बस स्टँड आणि अनाथालयात सोडून दिलेल्या 123 बेवारस मुलांना स्वतःचे नाव देऊन त्यांचे संगोपन केले आहे. शंकर बाबांनी आतापर्यंत अनेक दिव्यांग मुला मुलींचे लग्न लावून त्यांचे संसार थाटात उभे करून दिले. या आश्रमात 98 मुली आणि 25 मुले असे एकूण 123 मतिमंद, अपंग, अंध, निराधार, निराश्रित वास्तव्य करत आहेत. पापळकर अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.
हेही वाचा – महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार जाहीर, 6 पद्मभूषण आणि 6 पद्मश्रींचा मानकरी