मुंबई, 11 एप्रिल : वारकरी संप्रदायातील गायक व संगीतकार पंडीत कल्याणजी गायकवाड यांना संगीत क्षेत्रातील मानाचा असा महाराष्ट्र शासनाचा कंठसंगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पं. कल्याणजी गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. काल दिनांक 10-4-2023 रोजी मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
गेल्या 3 दशकांपासून त्यांनी संगीत क्षेत्रात भरीव कार्य केले आहे आणि वारकरी संप्रदायातील हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. तसेच सारेगमप लिट्ल चॅम्पसची विजेती आणि गायिका कार्तिकी गायकवाडचे ते वडील आहेत. काल मुंबई त्यांना राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा कंठसंगीत पुरस्काराने गौरविण्यात आले. ट्रॉफी, मानपत्र आणि एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार मिळाल्यावर व्यक्त केल्या या भावना –
पंडित कल्याणजी गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा कंठसंगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी आपली भावना व्यक्त केली. हा पुरस्कार केवळ माझा एकट्याचा नसून महाराष्ट्रातील तमाम संगीत रसिक आणि वारकरी संप्रदायातील संगीत साधना करणार्या संगीत साधकांचा आहे, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संगीत ही कला सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी अनेक गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने संगीत कला शिकवली आहे. सध्या ते आळंदी येथे वास्तव्यास आहेत. तसेच आळंदीमध्येच ते संगीत कलासाधना करतात. शास्त्रीय गायक म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच अभंगाच्या माध्यमातून ते घराघरात पोहचले आहेत. कल्याणजी गायकवाड आपल्या संगीत क्षेत्रातील आपल्या वेगळ्या शैलीमुळे ओळखले जातात. तसेच त्यांनी संगीतबद्ध केलेले अभंग सुरेश वाडकर, अजय पोहनकर, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, वैशाली सामंत यांनी गायिले आहेत.