ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा शहरातील व्यापारी भवन येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. गणेश मंडळांनी कमी उंचीच्या गणेश मूर्ती बसवाव्यात, असे आवाहनही यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.
नगरदेवळा कमान मोडावी लागली –
यावेळी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, पाचोऱ्याप्रमाणेच भडगावमध्येही मोठ्या उंचीच्या मूर्ती बसवल्या जातात. भडगाव शहरातील आझाद मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीमुळे नगरदेवळा कमान मला तोडावी लागली आणि नवीन कमान बांधावी लागली, असा किस्साही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितला. त्यामुळे आपल्या भावना महत्त्वाच्या आहेत. आपल्या भावना जर शुद्ध असतील तर आपल्या देव्हाऱ्यातील गणपतीही दोन इंचाचा असतो. त्यासाठी 25 फुटाचाच गणपती हवा, तेव्हाच तो पावतो, असं नाही.
मूर्ती आणताना मूर्तीचा हात, पाय तुटतो. कधी सोंड तुटते. त्यामुळे आपणच आपल्या दैवताची विटंबना करतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जर धरणाला पाणी नसेल तर त्या मुर्तीचे विसर्जन तुम्ही कुठे करणार, असा सवालही त्यांनी गणेशमंडळांना करत आगामी काळात कमी उंचीची गणपतीची मूर्तीची स्थापना करावी आणि आपल्या विचारांची उंची वाढवावी, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी गणेशमंडळांना केले.
दरम्यान, व्यापारी भवनात झालेल्या या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, तहसिलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक संदीप पवार तसेच पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, गणेशमंडळांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने ही बैठक झाल्याबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करत कौतुक केले.